महाराष्ट्र

maharashtra

सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीन नद्यांना पूर, गड नदीने ओलांडली धोक्याची पाणीपातळी

By

Published : Jun 16, 2021, 4:23 PM IST

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाला चांगलीच सुरुवात झालेली आहे. या सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील तीन नद्यांनी धोक्याची पाणीपातळी गाठली आहे. गड नदी, तेरे नदी आणि भंगसाळ नदी या दुधडी भरुन वाहत आहेत.

सिंधुदुर्गात तीन नद्यांना आला पूर, गडनदी  ओलांडली धोक्याची पातळी
सिंधुदुर्गात तीन नद्यांना आला पूर, गडनदी ओलांडली धोक्याची पातळी

सिंधुदुर्ग - जिल्ह्यात पावसाला चांगलीच सुरुवात झालेली आहे. या सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील तीन नद्यांनी धोक्याची पाणीपातळी गाठली आहे. कणकवलीत गड नदी दुथडी भरून वाहत आहे. तर, तेरेखोल नदीचे पाणी बांदा बाजारपेठेत घुसले आहे. दरम्यान, प्रशासनाने नदी किनारच्या नागरिकांना खबरदारीचा इशारा दिला आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीन नद्यांना पूर, गड नदीने ओलांडली धोक्याची पाणीपातळी

जिल्ह्यातील तीन नद्यांना आला पूर

सिंधुदुर्गमध्ये काल संध्याकाळपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नदी-नाले दुथडी भरून वाहताना पाहायला मिळत आहेत. जिल्ह्यातील गड, तेरेखोलसह भंगसाळ या तीन नद्यांना पूर आला आहे. कणकवलीतील गड नदीने धोक्याची पाणीपातळी गाठली आहे. या पार्श्वभूमीवर नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे. तसेच, कोल्हापूर, आचरा-मालवण राज्य महामार्गालगत गड नदीपात्र आहे. यामुळे राज्य मार्गावर नदी पात्रात पाणी बाहेर येऊन मार्ग ठप्प होण्याची शक्यता आहे. या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकाने योग्य ती खबरदारी घ्यावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

बांदा बाजारपेठेत घुसले पाणी

रात्रभर कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने सावंतवाडी तालुक्यातल्या तेरेखोल नदीच्या पुराचे पाणी बांदा आळवाडी बाजारपेठेत घुसले आहे. शहरातील आळवाडी-निमजगा रस्ता पाण्याखाली गेला आहे. येथील व्यापाऱ्यांनी दुकानातील सामान सुरक्षितस्थळी हलविले आहे. पहाटेच्या सुमारास पाणी भरण्यास सुरुवात झाल्याने व्यापारी व स्थानिकांची एकच तारांबळ उडाली. आळवाडी येथील दुकाने व घरांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. पाण्याची पातळी वाढत असून, स्थानिक प्रशासनाने सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. आळवाडी येथील मच्छीमार्केट इमारतीत पुराचे पाणी घुसले आहे. आळवाडी-निमजगा रस्ता पाण्याखाली गेला आहे. येथील छोटे विक्रेते, स्टॉल, चिकन सेंटरमध्ये पाणी शिरले आहे.

कणकवलीत रामेश्वर प्लाझामध्ये सलग तिसऱ्यावर्षी पाणी

कणकवली शहरातील हायवेलगतच्या रामेश्वर प्लाझामध्ये यंदा सलग तिसऱ्यावर्षी पाणी भरले आहे. गेले तीन-चार दिवस कोसळणार्‍या पावसामुळे मोठ्या प्रमाणात लगतच्या नाल्यांमध्ये पाणी आले होते. मात्र, गोकुळधाम हॉटेलच्या बाजूला पाण्याचा विसर्ग होत आहे. तसेच, येथील हायवेवरील ठेकेदारांनी सेंट्रींग साहित्य न काढल्यामुळे पुन्हा एकदा पाणी तुंबले आहे. हे पाणी रामेश्वर प्लाझा इमारतीमध्ये घुसल्याने वाहने पाण्यात अडकली होती. पहाटे चार वाजल्यापासून येथील नागरिकांनी मोठ्या अडचणीचा सामना करत आपली वाहने बाहेर काढली.

ABOUT THE AUTHOR

...view details