सिंधुदुर्ग - जिल्ह्यात गणपती सणासाठी तब्बल 3 लाख चाकरमानी दाखल झाले आहेत. गतवर्षी कोरोनामुळे अनेकांना गावचा गणपतीला जाता आले नाही. मात्र, यावर्षी चाकरमानी मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत.
दीड ते दोन लाख चाकरमानी जिल्ह्यात दाखल
रायगड, रत्नागिरी जिल्ह्यातील चौपदरीकरणाची अपूर्ण कामे, ठिकठिकाणचे खड्डे, धुवाँधार पाऊस, महागलेले पेट्रोल-डिझेल आदी विघ्नांवर मात करत राज्यभरातून सुमारे तीन लाख चाकरमानी गणेशोत्सवासाठी सिंधुदुर्गात दाखल झाले आहेत. पुढील दोन दिवसांत आणखी दीड ते दोन लाख चाकरमानी जिल्ह्यात येण्याची शक्यता आहे. यंदा कोरोना संसर्ग कमी झाल्याने मोठ्या संख्येने चाकरमानी जिल्ह्यात येत आहेत. दरम्यान, नियमित आणि गणेशोत्सव स्पेशल विशेष गाड्या देखील फुल्ल आहेत. कोकण रेल्वेच्या एकेरी मार्गावर वाहतुकीचा ताण असल्याने सर्वच रेल्वे गाड्या दोन ते तीन तास विलंबाने धावत आहेत.
मुंबईतून एस.टी.च्या ९० हून अधिक बस दाखल
सिंधुदुर्गातील चौपदरीकरण पूर्ण झाल्याने चाकरमान्यांचा खारेपाटण ते बांद्यापर्यंतचा प्रवास सुसाट झाला आहे. गतवर्षी कोरोना संसर्गामुळे चाकरमानी जिल्ह्यात फिरकले नव्हते. यंदा मात्र, चाकरमानी रेल्वे, खासगी बस आणि आपापल्या वाहनांतून जिल्ह्यात प्रवेश करत आहेत. जिल्ह्यात येणाऱ्या चाकरमान्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी जिल्हा पोलिस यंत्रणा आणि वाहतूक शाखेने चोख व्यवस्था ठेवली आहे. गतवर्षी कोरोनामुळे रेल्वे गाड्या बंद होत्या. यंदा मात्र कोकण रेल्वे मार्गावर तब्बल २२४ गणेशोत्सव विशेष गाड्या सोडण्यात आल्या आहेत. या विशेष गाड्या तीन सप्टेंबरपासून जिल्ह्यात येत आहेत. मुंबईतून एस.टी.च्या ९० हून अधिक बस जिल्ह्याच्या विविध आगारात दाखल झाल्या. आज रात्री आणि उद्या सायंकाळपर्यंत आणखी बस जिल्ह्यात येणार असल्याची माहिती महामंडळाकडून देण्यात आली.