सिंधुदुर्ग - जिल्ह्यातल्या सावंतवाडी येथील कारागृहात असलेला कैदी राजेश गावकर याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गेले काही दिवस फरार असलेला सावंतवाडी कारागृहाचा जेलर योगेश पाटील याला अखेर अटक करण्यात आली. ही कारवाई सिंधुदुर्ग पोलिसांच्या पथकाने नागपूर येथे केली. मात्र, त्याचा सहकारी अद्याप आढळून आलेला नाही.
याबाबत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक दीक्षित कुमार गेडाम यांनी दुजोरा दिलेला आहे. प्रकरण घडल्यानंतर यातील संशयित योगेश पाटील याने आपल्या सहकाऱ्यासमवेत अंतरिम अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, त्याचा जामीन अर्ज फेटाळून लावण्यात आला होता. त्यानंतर सिंधुदुर्ग पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली. याबाबत जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक गेडाम यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, नागपूर येथे पाटील याला ताब्यात घेण्यात आलेले आहे. येत्या दोन दिवसांत त्याला सिंधुदुर्गात आणले जाईल. मात्र, दुसरा सहकारी अद्याप मिळाला नसून, सिंधुदुर्ग पोलिसांचे पथक त्याचा शोध घेत आहे. दरम्यान, पाटील याच्यावर अटकेची कारवाई करण्यासाठी मनसेचे माजी आमदार तथा नेते परशुराम उपरकर यांनी आंदोलनाची भूमिका घेतली होती.