सिंधुदुर्ग -कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यात रुग्णांची संख्या वाढत आहे. सिंधुदुर्गातही कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे, खबरदारी म्हणून कणकवली नगरपंचायतीने दर मंगळवारी होणारा आठवडी बाजार बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. अशी माहिती कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली.
सुरुवातीला दर दिवशी कणकवली शहरात कोरोनाचे २० ते २५ रुग्ण आढळून येत होते. मध्यंतरी आम्ही शहरात जनता कर्फ्यू पाळला, त्यावेळी रुग्ण आढळण्याची संख्या शून्यावर आली होती. आता पुन्हा एकदा रुग्ण आढळू लागले आहेत. त्यामुळे, शहरात कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी आम्ही आठवडीबाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला, असे नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी सांगितले.