सिंधुदुर्ग - राज्यात कोरोनाची दुसरी लाट अजून ओसरलेली नसतानाच तिसऱ्या लाटेची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर नैसर्गिक संकटाचे परिणाम कमी करण्याच्या दृष्टीने राज्यातील किनारपट्टी जिल्ह्यांनी आवश्यक उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केले. कोरोना काळात उभारलेल्या तात्पुरत्या आणि इतर रुग्णालयातील वीज पुरवठा सुरळीत राखणे, ऑक्सिजन टँकची सुरक्षितता तपासणे, ऑक्सिजनचा पुरेसा साठा करून ठेवणे, पुराचे पाणी रुग्णालयात शिरू न देणे यादृष्टीने विशेष काळजी घेण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या आहेत.
'50 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाचे लोकार्पण'
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथे उभारण्यात आलेल्या रुग्णालयाच्या इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ऑनलाईन लोकार्पण करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे, पालकमंत्री उदय सामंत, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, आमदार दीपक केसरकर, माजी मंत्री डॉ. दीपक सावंत आदी उपस्थित होते. या उपजिल्हा रुग्णालयाचे भूमिपुजन झाले तेंव्हा राज्यात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव नव्हता. परंतू, आजच्या परिस्थितीत या रुग्णालयाच्या पुर्णत्वाचे महत्व विशेषत्वाने जाणवते. गेल्या वर्षीपासून आपल्यासमोर नैसर्गिक संकटांचे एक नवीन आव्हान उभे राहिले आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.