सिंधुदुर्ग -गोवा राज्यातील २१ खासगी रुग्णालये सोमवारपासून (दि. १७ मे) सरकार ताब्यात घेणार असल्याची घोषणा मुखमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली आहे. सोमवारपासून या रुग्णालयात रुग्ण दाखल करण्याचे अधिकार सरकारने आपल्याकडे घेतले आहेत. असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे. गोव्यात कोरोना दिवसेंदिवस वाढत असताना सरकारने घेतलेला हा निर्णय अत्यंत महत्वाचा ठरणार आहे.
२१ खासगी रुग्णालयातील निम्म्या खाटा सरकारच्या ताब्यात -
दीनदयाळ स्वास्थ्य योजनेत कोविड उपचार समाविष्ट केल्यानंतर खासगी रुग्णालयांनी या योजनेंतर्गत उपचार देणे नाकारले होते. त्यासाठी रुग्णालयात रुग्णांना खाटा नाहीत असे कारण देऊन वाटेला लावण्यात येत होते. सरकारकडे तशा तक्रारी येत होत्या. त्यामुळे कोविडचे उपचार देत असलेल्या २१ खासगी रुग्णालयातील निम्म्या खाटा सरकार ताब्यात घेणार आणि सोमवारपासून त्या रुग्णालयात कोविड उपचारासाठी रुग्ण दाखल करून घेण्याची प्रक्रिया सरकार आपल्या ताब्यात घेत असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत केली. यावेळी आरोग्यमंत्री विश्वजित राणे, आरोग्य सचिव रवी धवन, गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर, आरोग्य संचालक डॉ. जुझे डिसा व इतर डॉक्टर उपस्थित होते.
मात्र रुग्णालयांचे व्यवस्थापन त्या खासगी रुग्णालयांकडेच राहणार -
राज्यातील सरकारी रुग्णालयांच्या खाटा कोरोना रुग्णांसाठी कमी पडत असल्यामुळे खासगी रुग्णालयातील ५० टक्के खाटा कोरोना रुग्णांसाठी उपलब्ध कराव्यात. तसेच डीडीएसवायचा लाभ गोवेकरांना कोरोना उपचारासाठी द्यावा. अशी सूचना करण्यात आली होती. मात्र, वारंवार सूचना करूनही अनेक रुग्णालयांनी कोरोना रुग्णांवर उपचार करण्यास चालढकल सुरू केली. काहींनी कोरोना रुग्णांना दाखल करून घेतले. मात्र, बिले भरमसाठ लावली. त्यामुळे शेवटी सरकारने खासगी रुग्णालयांवर कडक कारवाई करण्याच्या उद्देशाने ती २१ ही खासगी रुग्णालये ताब्यात घेण्याचे ठरवले आहे. १७ मे पासून राज्यातील २१ ही खाजगी रुग्णालयात रुग्ण दाखल करण्याची प्रक्रिया सरकारकडे असेल, तर रुग्णालयांचे व्यवस्थापन त्या खासगी रुग्णालयांकडेच राहणार आहे. त्या रुग्णालयात जे यापूर्वी रुग्ण दाखल असतील त्यांच्यासाठी ५० टक्के खाटा सोडण्यात येतील व उर्वरित ५० टक्के खाटांचा ताबा सरकार आपल्याकडे घेणार आहे. खासगी रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका व आरोग्य कर्मचारी कायम राहणार असून सरकारने दाखल करून घेतलेल्या कोरोना रुग्णावर तेच उपचार करतील. सरकारचे डॉक्टर तेथे जाणार नाहीत. असेही मुख्यमंत्री म्हणाले.