सिंधुदुर्ग - कोरोनामुळे अनेक विठ्ठल भक्तांची पंढरपूर वारी चुकली. अनेकांनी घरीच एकादशी साजरी केली. मात्र, गवाणे येथील अक्षय मेस्त्री याने अत्यंत लहान आणि अत्यंत मोठी अशी दोन विठ्ठलाची चित्रे साकारून भक्तांना त्यांच्या लाडक्या विठ्ठलाचे अनोखे दर्शन घडविले. त्यामुळे यावर्षीची एकादशी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विठ्ठल भक्तांसाठी आगळीवेगळी ठरली आहे.
कलाकाराने साकारली अत्यंत लहान आणि अत्यंत मोठी विठ्ठलाची चित्रे - sindhudurg ashadhi ekadashi 2020
गवाणे येथील दीड एकर जमिनीत सहकाऱ्यांच्या मदतीने अक्षयने माळरानावर पावसाळी येणाऱ्या गवतामध्ये विठ्ठलाचे चित्र साकारले आहे. चित्राची उंची 340 फूट तर रुंदी 155 फूट आहे. हे भव्य दिव्य विठ्ठलाचे चित्र राज्यभर चर्चेचा विषय ठरला आहे.
यंदा कोरोनामुळे आषाढी एकादशी दिवशी पंढरपूरला जाऊन विठ्ठलाची भेट घ्यायचे अनेकांचे राहून गेले. अनेकजण पिढ्यांपिढ्या पायी वारी करून लांबच्या पल्ल्यावरून पंढरपूरला जातात. मात्र, त्यामध्ये यावर्षी खंड पडला. तरीही वारकऱ्यांच्या मनामधील भक्तीचा मळा कमी झालेला नाही. अशाच एका कलावंत भक्ताने आगळीवेगळी एकादशी साजरी करायचे ठरविले. अत्यंत लहान 3 सेमी लांबीची आणि अत्यंत मोठी 340 फूट उंचीची विठ्ठलाची प्रतिकृती त्याने निर्माण केली.
तुळशीच्या लहान पानावर विठ्ठलाचे रुप अक्षयने रेखाटले. 3 सेंटीमीटर लांब आणि 1 सेमी रुंद असलेल्या त्या पानावर अक्षयने अवघ्या तासाभरात विठ्ठलाचे रूप साकारले. याबाबत अक्षय म्हणाला, लॉकडाऊनमुळे कॅनव्हास आणि इतर साहित्य मिळत नाही. त्यामुळे गप्प बसून राहण्यापेक्षा सराव महत्त्वाचा आहे. चित्रकला ही सरावाशिवाय साध्य होत नाही. त्यामुळे एकादशीचे निमित्त साधून विठ्ठलाचे चित्र तुळशीच्या पानावर रेखाटले.
दुसरीकडे 20 दिवसांपासून गवाणे येथील दीड एकर जमिनीत सहकाऱ्यांच्या मदतीने अक्षयने माळरानावर पावसाळी येणाऱ्या गवतामध्ये विठ्ठलाचे चित्र साकारले आहे. चित्राची उंची 340 फूट तर रुंदी 155 फूट आहे. हे भव्य दिव्य विठ्ठलाचे चित्र साकारण्यासाठी अक्षयला प्रकाश पावरा, गुरूथास साटम, सिद्धेश राणे, रोहित वरक, शुभम राडये, ऋषिकेश आयरे, राकेश तोरस्कर यांनी मदत केली. या चित्रामागील कल्पना विचारली असता अक्षयने सांगितले, की कलाकाराने प्रत्येकवेळी सराव केला पाहिजे. त्यासाठी साधने मिळाली नाहीत तर उपलब्ध साहित्यातून कला निर्मितीचा आस्वाद आणि आनंद घेता आला पाहिजे. सध्या लॉकडाऊन असल्याने अनेकजण निवांत होते. त्यांना मदतीला घेऊन हे चित्र साकारण्यात आले आहे.