महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अरुणा पाटबंधारे प्रकल्प: निविदा क्र.३ नव्याने राबवली जाणार, मंत्री जयंत पाटील यांचे आश्वासन - ncp leaders visit minister jayant patil

या प्रक्रियेबाबत शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी आपल्याला तक्रारींचे जे पत्र दिले, त्या पत्रातील सही आणि कार्यकारी अभियंता याना दिलेल्या पत्रातील सही वेगवेगळी असून, ज्या अधिकाऱ्यांबाबत आमदार नाईक तक्रार करतात त्याच अधिकाऱ्यांना ही प्रक्रिया राबवायला हरकत नाही असे पत्र देतात, यावरून आमदार नाईक यांचीही भूमिका संशयास्पद वाटते.

अरुणा पाटबंधारे प्रकल्प
अरुणा पाटबंधारे प्रकल्प

By

Published : Oct 11, 2020, 8:39 PM IST

सिंधुदुर्ग- जिल्ह्यातील वैभववाडी येथील अरुणा मध्यम पाटबंधारे प्रकल्पाच्या निविदा क्रमांक ३ च्या प्रक्रियेत घोळ असून, ही प्रक्रिया रद्द करून नव्याने घेण्यात यावी, अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून होत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर, वैभववाडी तालुकाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आज राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची सांगली येथे भेट घेतली. यावेळी मंत्री जयंत पाटील यांनी या प्रक्रियेची चौकशी करून ही प्रक्रिया नव्याने राबवली जाणार असल्याचे आश्वासन दिले.

वैभववाडीमध्ये अरुणा मध्यम पाटबंधारे प्रकल्पाचे काम सुरू आहे. या प्रकल्पाच्या कामात मुळातच अनियमितता झाली आहे. तसेच, या प्रकल्पाच्या निविदा क्रमांक ३ च्या प्रक्रियेतसुद्धा घोळ झाला आहे. ही प्रक्रिया राबवताना आपापसात कामे मॅनेज करून ती ठराविक ठेकेदारांना वाटली गेली आहेत. तसेच, या प्रक्रियेत स्थानिक अधिकारी व ठेकेदार यांची मिलीभगत असून, भाजपा प्रणित पदाधिकाऱ्यांनी ही कामे आपापसात वाटून घेतली आहेत. ही बाब पदाधिकाऱ्यांनी मंत्री जयंत पाटील यांच्या लशात आणून दिली.

तसेच, या प्रक्रियेबाबत शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी आपल्याला तक्रारींचे जे पत्र दिले, त्या पत्रातील सही आणि कार्यकारी अभियंता याना दिलेल्या पत्रातील सही वेगवेगळी असून, ज्या अधिकाऱ्यांबाबत आमदार नाईक तक्रार करतात त्याच अधिकाऱ्यांना ही प्रक्रिया राबवायला हरकत नाही असे पत्र देतात, यावरून आमदार नाईक यांचीही भूमिका संशयास्पद वाटते. अधिकारी आणि आमदार नाईक यांच्यात अर्थपूर्ण तडजोड झाल्याने नाईक यांनी एका रात्रीत आपली भूमिका बदलली आहे. याची आपण दखल घ्यावी, असे पदाधिकाऱ्यांनी मंत्री पाटील यांना सांगितले.

ही प्रक्रिया पूर्णपणे संशयाच्या भोवऱ्यात अडकलेली आहे. आधीच या प्रकल्पाच्या कामातील अनियमिततेमुळे स्थानिक लोकांमधून मोठी नाराजी आहे. तर, आता अधिकारी व ठराविक ठेकेदार यांच्या संगनमताने या प्रकल्पाची निविदा क्रमांक ३ राबवली गेली असून, ती तात्काळ रद्द करावी आणि नव्याने राबवण्याचे आदेश संबधित अधिकाऱ्यांना द्यावेत, अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी मंत्री पाटील यांच्याकडे केली. यावेळी ही प्रक्रिया नव्याने राबवली जाईल, असे आश्वासन पाटील यांनी दिले. त्यामुळे, जिल्ह्यात अरुणा पाटबंधारे प्रकल्पातील अधिकारी व ठेकेदार यांचे धाबे दणाणले आहेत.

भेटी दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस रुपेश जाधव, कणकवली तालुकाध्यक्ष राजेंद्र पावसकर, डॉ. अभिनंदन मालंडकर, कृषी सेलचे जिल्हाध्यक्ष समीर आचरेकर, सुंदर पारकर, संकेत सावंत, देवेंद्र पिळणकर आदी उपस्थित होते.

हेही वाचा-आमदार नाईक यांचे काम शून्य; मात्र फोटोसेशनची शंभरी, मनसे नेते उपरकर यांचा आरोप

ABOUT THE AUTHOR

...view details