सिंधुदुर्ग - तौक्ते चक्रीवादळाने सिंधुदुर्गातील शेती, बागायती आणि मालमत्तेचे मोठे नुकसान केले आहे. निसर्ग चक्रीवादळाच्या धर्तीवर मदतीचा जीआर शासनाने जारी केला आहे. मात्र ही मदत अत्यंत तुटपुंजी आहे, अशी येथील बागायतदारांची भावना आहे. येथील नाराज वादळग्रस्त आता शासनाकडे वाढीव मदतीची मागणी करत आहेत.
सिंधुदुर्गात तौक्ते वादळाने केले मोठे नुकसान -
सिंधुदुर्ग जिल्ह्यात तौक्ते चक्रीवादळात वेंगुर्ले तालुक्यात माड व सुपारी बागायतीचे मोठे नुकसान झाले आहे. तर देवगड तालुक्यातील अनेक ठिकाणी हापूस बागायतीचे नुकसान झाले आहे. किनारी भागात मच्छिमारांच्या नौकांचे नुकसान होतानाच देवगड बंदरात दोन नौका बुडून चार खलाशी मृत्युमुखी पडले. बागायतीच्या नुकसानीचे पंचनामे झाले, शासनाचा मदतीचा जीआर देखील निघाला. मात्र अद्यापही नुकणीच्या वाटपाला सुरवात झालेली नाही.
'तौक्ते'च्या नुकसान भरपाईचा जीआर शासनाची मदत अत्यंत तुटपुंजीवेंगुर्ले तालुक्यातील दाभोली बोवलेकर वाडीतील देवदत्त गोखले सांगतात, या वादळात आमच्या १६० सुपारीची झाडे आणि आमचे एक घर पूर्ण उद्धवस्थ झालं. ७ मंद मोडून पडलेले आहेत. ३ फणसाची झाडेही मोडून पडलेली आहेत. ३ रातांब्याची झाडे आणि ६ काजूची कलमे मोडून पडलेली आहेत. या वादळात आमचे मोठे नुकसान झालेले आहे. हे नुकसान पाहता शासनाने जो जीआर काढलेला आहे त्यातून जी मदत मिळणार आहे ती अत्यंत तुटपुंजी आहे. त्यामुळे या मदतीत वाढ होऊन एका सुपारी मागे २०० ते २५० रुपये आणि एका माडाच्या झाडामागे ५०० ते ५५० रुपये मिळावे, अशी आमची मागणी आहे. शासनाच्या लोकांनी आमच्या नुकसानीचे पंचनामे केलेले आहेत. मात्र अद्यापही आम्हाला नुकसानभरपाई मिळालेली नाही असेही ते म्हणाले.
शासनाच्या मदतीबाबत बागायतदार नाराजसंतोष गोखले यांनी माड आणि सुपारीच्या झाडाच्या उत्पन्नाचं गणित आणि शासनाच्या मदतीतून काय मिळणार आहे. याची वस्तुस्तिथी मांडली. ते सांगतात की, माडाचे झाड चौथ्या ते पाचव्या वर्षांपासून उत्पन्न द्यायला सुरुवात करतो. सुपारीचा झाड तिसऱ्या वर्षांपासून उत्पन्न द्यायला सुरुवात करत. सुपारीचे एक झाड वर्षाला ३ किलोपर्यंत सुपारी देत. माडाचे झाड १२० पर्यंत नारळ देत. सुपारीचे झाड ४० ते ४५ वर्ष आणि माडाचे झाड ६० ते ७० वर्षापर्यंत उत्पन्न देत. शासन देत असलेली मदत या झाडांच्या लागवडीसाठीही पुरणारी नाही. त्यामुळे शासनाने जास्तीतजास्त नुकसान भरपाई द्यावी, अशी आमची मागणी असल्याचे त्यांनी सांगितले.
सर्वस्व उद्ध्वस्त झालेला मालवणी माणूस वाढीव मदतीच्या प्रतीक्षेत-दरम्यान इथल्या मालवणी मुलखातील माणूस झाडांची आपल्या मुलांसारखी जोपासना करतो. किंबहुना हीच माडा सुपारीची झाडे त्याच्या उत्पन्नाचे आणि जगण्याचे साधन असते. या वादळाने इथल्या माणसाचे हे सर्वस्व उद्धवस्थ केले आहे. शासनाने ठोस आणि वाढीव मदत द्यावी अशी इथल्या माणसाची मागणी आहे. शासनाने या नुकसानीवर मदतीचा जीआर काढला असला तरी कोकणी माणसाच्या मनात याबाबत मोठी नाराजी आहे. हि नाराजी इथला माणूस कशी व्यक्त करतो हे येणाऱ्या काळात दिसून येईल.