सिंधुदुर्ग- तातू सीताराम राणे ट्रस्टच्या माध्यमातून सिंधुदुर्गात ३५ हजार लोकांना आरोग्यवर्धक मल्टीव्हिटॅमिन बी ज्यूस चे वाटप करण्यात येणार आहे. कोरोना संसर्गाच्या काळात रोगप्रतिकारक शक्ती वाढवत आरोग्य जपणे आवश्यक आहे. रुग्णालयात उपचार घेत असलेल्या तसेच, संस्थात्मक क्वॉरंटाईन असलेल्या लोकांना मल्टीव्हिटॅमिनची असलेली गरज ओळखून माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांच्या माध्यमातून हे मल्टीव्हिटॅमिन बी उपलब्ध करुन दिले आहे. भाजपच्या वतीने त्याचे वाट केले जाणार आहे, अशी माहिती भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी दिली.
प्रहार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत तेली बोलत होते. यावेळी भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष भाई सावंत, युवा मोर्चा जिल्हा संघटन सरचिटणीस संदीप मेस्त्री, कणकवली युवा मोर्चा तालुकाध्यक्ष गणेश तळगावकर आदी उपस्थित होते.
भाजप युवा मोर्चाच्या माध्यमातून जिल्ह्यात जिल्हा परिषदनिहाय मल्टीव्हिटॅमिन बी चे वाटप केले जाणार आहे, असे यावेळी तेली यांनी सांगितले. कोरोनामुळे लॉकडाऊन झाल्यानंतर केंद्र व राज्य नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली भाजपने सिंधुदुर्गात अनेक सेवाभावी कामे केली. ५५ हजार लोकांपर्यंत मदत पोहोचवली. २० लाख होमिओपॅथी गोळ्यांचे वाटप आमदार नितेश राणे, आमदार रवींद्र चव्हाण यांच्या वतीने भाजपने केले आहे. जि.प.च्या सभेत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी शासनाच्या माध्यमातून होमिओपॅथी गोळ्या खरेदी केल्या नसल्याचे स्पष्ट केले. मग सत्ताधाऱ्यांनी होमिओपॅथी गोळ्यावाटपाचे फोटोसेशन का केले? असा सवाल तेली यांनी केला.