सिंधुदुर्ग- उपअभियंता प्रकाश शेडेकर या अधिकाऱ्यावर चिखल फेकल्या प्रकरणी आमदार नितेश राणे सध्या पोलीस कोठडीत आहेत. मात्र, त्यांच्या समर्थनार्थ स्वाभिमानने कणकवलीत बॅनरबाजी करत त्यांच्या कृत्याचे समर्थन केले आहे. कणकवली शहराच्या प्रत्येक चौकात स्वाभिमान पक्षाकडून 'रडलो नाही, लढलो' अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले आहेत.
नितेश राणेंच्या समर्थनार्थ स्वाभिमानची कणकवलीत बॅनरबाजी बॅनरच्या माध्यमातून स्वाभिमानाने त्यांच्या चिखलफेकीच्या कृत्याचे समर्थन केले आहे. त्यामुळे सध्या हे बॅनर कणकवलीकरांचे लक्ष वेधत आहे.
चिखलफेकीच्या प्रकारानंतर सिंधुदुर्गात राजकीय वातावरण तापले आहे. शिवसेना भाजपकडून श्रेयासाठी महामार्गावरील चिखल समस्येवर मंत्र्यांकडे पाठपुरावा केला असल्याचा दावा केला जात आहे. तसेच विरोधकांकडून नितेश राणेंनी आणि स्वाभिमानने फक्त स्टंटबाजी केल्याचा आरोप होत आहे. तर स्वाभिमान कडून देखील लोकांसाठीच हे आंदोलन केल्याचे वारंवार सांगितले जात आहे.
मुंबई गोवा महामार्गावर खड्डे पडल्याने आणि चिखल उडत असल्याने नितेश राणे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी उपअभियंता प्रकाश शेडेकर यांना गडनदीवरच्या पुलाला बांधले आणि त्यांच्या डोक्यावर चिखलाच्या बादल्या ओतल्या.