सिंधुदुर्ग - नापणे येथील 17 एकर शासकीय जागा अखेर नियोजित ऊस संशोधन केंद्र उभारणीसाठी दापोली कृषी विद्यापीठाकडे हस्तांतरित करण्यात आली आहे. त्यामुळे ऊस संशोधन केंद्र उभारणीतील मोठा अडसर दूर झाला आहे. जमीन हस्तांतरणामुळे आता या जागेत विद्यापीठाला आपल्या उपक्रमांना सुरुवात करता येणार आहे.
सिंधुदुर्ग : ऊस संशोधन केंद्रातील अडसर दूर, दापोली कृषी विद्यापीठाला जमीन हस्तांतरित
नापणे येथील 17 एकर शासकीय जागा अखेर नियोजित ऊस संशोधन केंद्र उभारणीसाठी दापोली कृषी विद्यापीठाकडे हस्तांतरित करण्यात आली आहे. त्यामुळे ऊस संशोधन केंद्र उभारणीतील मोठा अडसर दूर झाला आहे
कोकणात ऊसाचे वाढते क्षेत्र लक्षात घेऊन येथील शेतकऱ्यांना सुधारित तंत्रज्ञान आणि प्रशिक्षण उपलब्ध व्हावे, या उद्देशाने शेतकऱ्यांच्या मागणीनुसार भाजपचे तत्कालीन जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद जठार यांनी नापणे येथे ऊस संशोधन केंद्र सुरू व्हावे, अशी मागणी शासनाकडे केली होती. या पार्श्वभूमीवर आता ऊस संशोधन केंद्रासाठी आवश्यक असलेल्या जागा हस्तांतरण प्रकियेला गती मिळाली आहे.
या जागेचे मुल्यांकन 23 लाख 52 हजार 958 रुपये इतके आहे. ही रक्कम डॉ. बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठाने महसूल विभागाकडे भरणा केली. त्यानंतर हा भूखंड विद्यापीठाकडे हस्तांतरण करण्याची प्रकिया सुरू झाली होती. मात्र मार्चपासून कोरोनाच्या सावटात ही हस्तातंरण प्रकिया मंदावली होती. मात्र आता ऊस संशोधन केंद्र उभारणीच्या कामाला गती मिळालीये. ऊस संशोधन केंद्रासाठी नियोजित जागा विद्यापीठाकडे हस्तांतरित करण्याचे आदेश जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी वैभववाडी तहसीलदारांना दिले होते. त्यानुसार तहसीलदार रामदास झळके यांनी फोंडाघाट संशोधन केंद्राचे विजय शेट्ये यांच्याकडे हस्तांतरण आदेशाची प्रत दिली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य सुधीर नकाशे, किशोर जैतापकर, मंडळ अधिकारी पावसकर आदी उपस्थित होते. या ऊस संशोधन केंद्रामुळे शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.