महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आंग्रीया बँकेच्या संरक्षणासाठी राज्य सरकारकडून हिरवा कंदील - sindhudurg angriya bank news

आंग्रीया बँकच्या जैवविविधता संरक्षणाचा प्रश्न होता. मध्यंतरी या आंग्रीया बँकच्या अभ्यासासाठी पर्यटनविकास महामंडळांनी मोहीम आखली होती. यात देशभरातील सोळा तज्ज्ञ सहभागी झाले होते.

state government give order to development of angriya bank at sindhudurg
state government give order to development of angriya bank at sindhudurg

By

Published : Aug 9, 2020, 3:06 PM IST

सिंधुदुर्ग- जिल्ह्यातील अरबी समुद्रात जैवविविधतेने समृद्ध असलेल्या आंग्रीया बँक हे प्रवाळ बेट नियुक्त क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यासाठी केंद्राकडे शिफारस करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीतील उच्चस्तरीय बैठकीत घेण्यात आला. यामुळे या समृद्ध पर्यावरणीय ठेव्याला संरक्षण द्यायला राज्याचा हिरवा कंदील मिळाला आहे.

राज्यातील पर्यावरणविषयी विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री ठाकरे, वनमंत्री संजय राठोड, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार धीरज देशमुख यांच्यासह राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य, वनविभागाचे अधिकारी यांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे नुकतीच बैठक झाली. या वेळी कांदळवन क्षेत्रातील सफेद चिप्पी या वृक्षाला राज्य कांदळवन वृक्ष घोषित करण्यासही मान्यता देण्यात आली.

यावेळी येथील आंग्रीया बँकबाबत महत्त्वपूर्ण निर्णय झाला. मालवणपासून ११० किलोमीटर व विजयदुर्गपासून ९० किलोमीटर दूर समुद्रात हे प्रवाळ बेट आहे. समुद्राच्या आत विशेषतः चिखलापासून बनलेल्या या बेटाची व्याप्ती ४० किलोमीटर लांब व १८ किलोमीटर रूंद इतकी आहे. यावर समृद्ध असे सागरी जीवन आहे. यात विविध प्रकारचे मासे, शेवाळ, अन्य सागरी वनस्पती आदीचा समावेश आहे.

हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटनस्थळ होऊ शकते. त्या दृष्टीने प्रयत्नही सुरू झाले; मात्र मुळात या आंग्रीया बँकच्या जैवविविधता संरक्षणाचा प्रश्न होता. मध्यंतरी या आंग्रीया बँकच्या अभ्यासासाठी पर्यटनविकास महामंडळांनी मोहीम आखली होती. यात देशभरातील सोळा तज्ज्ञ सहभागी झाले होते.

येथील जैवविविधता नेमकेपणाने अभ्यासणे हा या मागचा उद्‌देश होता. यात कर्नाटक-मंगळूर येथील वाईल्ड लाईफ कंन्झरव्हेशन सोसायटी, महाराष्ट्र शासन कांदळवन विभाग, पर्यटन विकास महामंडळाची इस्दा ही संस्था कोचीन येथील सीएमएलआरई आदींनी यात सहभाग घेतला होता. आता याचा पुढचा टप्पा म्हणून आज या भागाच्या पर्यावरण संरक्षणासाठी राज्याने हिरवा कंदील दाखवला आहे. मेरीटाईम झोन कायद्यांर्तगत आंग्रीया बँकला नियुक्त क्षेत्र म्हणून अधिसूचित करण्यासंदर्भात केंद्राकडे शिफारस करायला यात मान्यता दिली आहे. आता याबाबत केंद्राकडून अंतिम निर्णय अपेक्षित आहे.

याबाबत बोलताना सागरी जीव संशोधक, इस्दा संस्थेचे संचालक डॉ. सारंग कुलकर्णी म्हणाले, राज्याने घेतलेला हा महत्त्वपूर्ण निर्णय आहे. जागतिक तापमान वाढीचे परिणाम सागरी पर्यावरणावरही दिसत आहेत. आंग्रीया बँक येथे समृध्द जैवविविधता आहे. याच्या सुरक्षेसाठी ठोस निर्णय अपेक्षीत आहे. आम्ही याबाबत पाठपुरावा केला होता. आता राज्याने शिफारस केली आहे. केंद्र आणि भारतीय नौदलाची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे, असेही ते म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details