महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ईटीव्ही भारत विशेष - सिंधुदुर्गात मासळी उद्योगासमोरील समस्या वाढल्या

मच्छिमारांच्या समुद्रातील समस्या अत्यंत वाईट अनुभव देणाऱ्या आहेत. कोकण किनारपट्टीवरील मासेमारी व्यवसाय आणि मच्छिमारांच्या गरजांचा आढावा 'ईटीव्ही भारत'ने घेतला आहे.

fishing in sindhudurg
ईटीव्ही भारत विशेष - सिंधुदुर्गात मासळी उद्योगासमोरील समस्या वाढल्या

By

Published : Dec 9, 2020, 1:57 PM IST

सिंधुदुर्ग - देवगड, मालवण, वेंगुर्ला या तीन तालुक्यांच्या समुद्र किनारी मोठ्या प्रमाणात मासेमारी करण्यात येते. मात्र, या तिनही तालुक्यात मच्छिमारांच्या बोटी अत्यंत सुरक्षितपणे लागतील, अशी एकही बंदर-जेटी नाही. तसेच मासळी साठवण्यासाठी कोल्ड स्टोरेज नाही. मच्छिमारांच्या समुद्रातील समस्याही अत्यंत वाईट अनुभव देणाऱ्या आहेत. कोकण किनारपट्टीवरील मासेमारी व्यवसाय आणि मच्छिमारांच्या गरजांचा आढावा 'ईटीव्ही भारत'ने घेतला आहे.

ईटीव्ही भारत विशेष - सिंधुदुर्गात मासळी उद्योगासमोरील समस्या वाढल्या

मालवण हे जिल्ह्यातील मासेमारीचे मुख्य केंद्र आहे. या ठिकाणच्या मच्छिमारांशी आणि त्यांच्या संघटनांच्या नेत्यांशी संवाद साधल्यानंतर येथील भीषणता समोर आली. या ठिकाणच्या समुद्रात अत्याधुनिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या भांडवलदारी उद्योजकांच्या आक्रमणाला येथील मच्छिमार तोंड देत आहे. शिवाय स्थानिक पातळीवरच्या समस्या त्यांना सतावत आहेत. घटत्या मत्स्य उत्पादनामुळेही मच्छिमार अडचणीत आल्याचे समोर येत आहे. सध्या समुद्रात ६० ते ६५ टक्के मासळी उत्पादन घातले जाते. या भागात ३५ हजार सक्रिय मच्छिमार आहेत. काही वर्षांपूर्वी केवळ मालवणमध्ये ३५० ट्रॉलर होते आता केवळ ६० ते ६५ शिल्लक असल्याचे येथील जाणकार सांगतात.

छोटू सावजी हे मालवणमधील श्रमिक मच्छिमार संघाचे अध्यक्ष आहेत. ते स्वत: मासेमारी करतात. याठिकाणी एकाही जेटीची सुविधा नसल्याचे त्यांनी सांगितले. कोल्ड स्टोरेज देखील नाहीत. बाहेर मासेमारीसाठी हायस्पीड टॉलर, एलईडी बोट, पर्ससीन नेट असल्याने त्या मच्छिमारांना चांगले उत्पादन मिळते. तामिळनाडू, पॉंडिचेरी, गोवा, गुजरात या राज्यात मच्छिमार करणारे यांत्रिक बोट धारक आपल्याकडे येतात. त्यांच्याकडून आमच्या स्थानिक मच्छिमारांना मोठा त्रास आहे, असे सावजी म्हणाले. त्यांची जाळी तोडून नेणे किंवा मारहाण करणे, बंदुकीचा धाक दाखवणं असे प्रकार करून येथील मच्छिमारांना उद्धवस्त करण्याचा भांडवलदारी प्रयत्न करत आहेत. यासाठी सरकारचा कोणताही धाक त्यांना नाही. त्यांची हद्द ठरलेली आहे. मात्र सरकार त्यांच्यावर बंधन लादत नाही. मच्छिमारांच्या प्रकारानुसार त्यांच्या जलक्षेत्राची मर्यादा ठरलेली आहे. याबाबत सोमवंशी कमिटीनेही सरकारला अहवाल दिलेला आहे. या अहवालाच्या अटी सरकार स्वीकारत नसल्याचे मच्छिमारांनी सांगितले.

कोकण किनारपट्टीवरील मासेमारी व्यवसाय आणि मच्छिमारांच्या गरजांचा आढावा 'ईटीव्ही भारत'ने घेतला आहे.

अवैध मासेमारीमुळे आर्थिक सुबत्ता देणारे मासे घटले

दिलीप घारे हे रापण हा पारंपरिक मच्छिमार व्यवसाय करतात. ते श्रमजीवी रापण संघाचे अध्यक्ष आहेत. मागील १० ते १२ वर्ष सातत्याने मच्छिमार मासेमारीतील अडचणींविरोधात लढा देत आहे. शासनाने याची दखल घेतली पाहिजे. तसे होत नसल्याने मच्छिमार मत्स्य दुष्काळाशी सामना करत आहे. हा सामना करत असताना समुद्रात ज्या आर्थिक सुबत्ता देणाऱ्या माशाच्या प्रजाती आहेत, त्या सततच्या अवैध मासेमारीमुळे कमी होत आहेत. परिणामी मच्छिमार आपला रोजगार गमावून बसले आहेत. यासाठी सातत्याने मच्छिमार संघटना हायस्पीड गस्ती बोटींची मागणी करत आहेत. मात्र शासन याकडे दुर्लक्ष करत आहे. ज्या गस्तीच्या बोट उपलब्ध आहेत, त्या अत्याधुनिक बोटींपेक्षा कमी क्षमतेच्या आहेत. आज या किनारपट्टीवर जवळपास ८० टक्के नौका उभ्या आहेत. माशांचे साठे कमी होत असल्याने ही स्थिती ओढवली आहे, असे ते म्हणाले.

देवगड, मालवण, वेंगुर्ला या तीन तालुक्यांच्या समुद्र किनारी मोठ्या प्रमाणात मासेमारी करण्यात येते.

नुकसान सोसतो आणि घरी येतो - मच्छिमार

मालवण दांडी गावातील संतोष प्रकाश पेडणेकर हे मच्छिमारी करून आपला उदरनिर्वाह करतात. ते म्हणाले म्हणाले, आम्ही समुद्रात गेल्यानंतर हायस्पीड वाले, एलईडी लाईटवाले, पर्ससीन नेट वाले हे थेट आमच्या जाळ्यांवरून बोटी घेऊन जातात. त्यामुळे आमचे नुकसान होते. आम्ही काही बोलत नाही, कारण ते मोठ्या संख्येने असतात. दादागिरी करतात. बऱ्याचवेळा ते आमची जाळीही तोडून घेऊन जातात. सूर्य मावळला की किनाऱ्याच्या जवळ घुसतात. दिवसा ते २० ते २५ वाव अंतराच्या बाहेर असतात आणि रात्री ते १२ वाव अंतरावर येतात. त्यांच्या कल्पने बोटी असतात. त्यामुळे आम्ही त्यांना काही करू शकत नाही. आम्ही काही केल्यास ते आम्हाला मारून टाकतील, आमच्या बोटी फोडून टाकतील. त्यामुळे नुकसान झाले, तरी आम्ही गप्प बसतो. त्यांच्या बोटी मलपी बंदर, गुजरात, मुंबई, गोवा या भागातून येतात. नजर पोचत नाही एवढ्या उंच असतात. त्यांच्या आम्ही जवळ जाऊ शकत नाही. नुकसान सोसतो आणि घरी येतो असे त्यांनी सांगितले.

एलईडी फिशिंग वाढल्याने अन्य समुद्री प्राण्यांना धोका

मालवणमधील कृतीशील मच्छिमार महेंद्र पराडकर म्हणाले, इथल्या किनाऱ्यावर एलईडी फिशिंग वाढली आहे. त्यामुळे मत्स्य जीव आणि सागरी जीवांवर त्याचा परिणाम होत आहे. किनारी भागात मोठ्या प्रमाणावर मृत कासव, डॉल्फिन, देवमासे आढळत आहेत. सिगल पक्षीही मोठ्या प्रमाणात मृत होत आहेत. तसेच अन्य राज्यातील मोठे मच्छिमार अनधिकृत पणे याठिकाणी मासेमारी करतात. त्यांची जाळी तुटून जाऊन घोस्ट फिशिंगसारखे प्रकार येथे घडत आहेत. त्यातून समुद्री कासव या जाळ्यात आढळत आहेत. शासनाने याबाबत कडक नियम केले पाहिजेत, असे ते म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details