सिंधुदुर्ग -काजू प्रोसेसिंग हा सिंधुदुर्ग येथील महत्वाचा लघु उद्योग आहे. जिल्हा उद्योग केंद्र आणि खादी ग्रामोद्योग यांच्या माध्यमातून हे उद्योग येथील तरुणांनी उभारलेले आहेत. तर ट्रॉफी बनवण्याचा उद्योगही काही तरुणांनीही बेरोजगारीत पर्याय म्हणून स्विकारला आहे. मात्र, मोठे शिक्षण घेऊनही नोकरी नाही. त्यात कर्ज घेऊन उभारलेल्या या लहान उद्योगांवर आता कोरोना लॉकडाऊनचे संकट कोसळले आहे. त्यामुळे अनेक लघु उद्योजक सध्या चिंतेत आहेत.
लॉकडाऊनमुळे कणकवलीतील लघु उद्योजक अडचणीत... हेही वाचा...कोरोना इफेक्ट : कोट्यवधींची सुरंगीची उलाढाल अडचणीत, शेतकऱ्यांकडे कळा आहे पडून
साधारण १० ते १५ लाखाची गुंतवणूक असलेले हे उद्योग प्रामुख्याने बँकांच्या कर्जावर उभे राहिलेले आहेत. बँकांनी काही काळ कर्जाच्या हप्त्यात सूट दिली असली तरी आज ना उद्या हे हप्ते भरावेच लागणार आहेत. जर व्यवसायच झाला नाही तर हे हप्ते कसे भरायचे, याची चिंता या उद्योजकांना सतावत आहे.
काजू प्रोसेसिंगचे काम करणाऱ्या लोकांचा हंगाम आता हातातून गेला आहे. तसेच विविध कार्यक्रमावर अवलंबून असणारा ट्रॉफी उद्योगही असाच अडचणीत सापडला आहे. कोरोनाच्या संकटात कार्यक्रम रद्द झाले असून ट्रॉफीला मागणी येत नाही. एकंदरीत कोरोनामुळे लघु उद्योजकांच्या अडचणीत चांगलीच वाढ झाल्याचे दिसत आहे.