सिंधुदुर्ग -गोवा राज्यात नोकरीला जाणारे अनेकजण लॉकडाऊनमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात अडकले आहेत. लॉकडाऊनची मुदत अनिश्चत असल्याने गोवा राज्यातील कंपनींच्या मालकांनी या लोकांना वेतन द्यावे तसेच नोकऱ्यांमध्ये सामावून घ्यावे, अशा मागणीचे निवेदन तहसीलदार राजाराम म्हात्रे यांना देण्यात आले.
'सिंधुदुर्गातील युवकांना गोव्यातील कंपन्यांनी नोकरीत सामावून द्यावे' - सिंधुदुर्ग लॉकडाऊन न्यूज
गोवा राज्यातील कंपन्यांमध्ये सिंधुदुर्गातील अनेक युवक काम करतात. ते लॉकडाऊनमुळे त्यांच्या गावी अडकून पडले आहेत. त्यामुळे कंपन्यांनी लॉकडाऊन काळातील पगार द्यावा तसेच कामावर पुन्हा घ्यावे, यासाठी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांना निवेदन देण्यात आले.
रोजगाराचा मोठा प्रश्न असल्याने जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांचे लक्ष वेधणार असल्याचे तहसीलदार म्हात्रे यांनी सांगितले. गोवा सीमाभागातील सातार्डा गावचे माजी सरपंच उदय पारिपत्ये, दोस्ती युवक मंडळाचे अध्यक्ष योगेश गोवेकर, पत्रकार परशुराम मांजरेकर यांनी पंचक्रोशीतील तरुण-तरुणींच्या स्वाक्षरीचे निवेदन सादर केले.
लॉकडाऊनमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रवेशद्वार असलेले पोलीस चेकपोस्ट बंद आहे. गोव्यातील कंपनी मालकांनी कर्मचाऱ्यांसाठी पासची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. मात्र, कोरोना व्हायरस तपासणी फी, संस्थात्मक विलगीकरण शुल्क कर्मचाऱ्यांना परवडणारे नाही. कंपनी मालकांनी याचा विचार करावा, अशी विनंती या निवेदनातून करण्यात आली आहे.