सिंधुदुर्ग - अवकाळी पावसाने जिल्ह्याला आज सायंकाळी झोडपले. जिल्ह्यात पडकेल्या अचानक पावसाच्या सरींमुळे हापूस आणि काजू बागायतदार अडचणीत आले आहेत. गारपिटीसह पडलेल्या पावसामुळे बागायती क्षेत्र धोक्यात आले आहे.
गारपिटीसह पडला पाऊस
जिल्ह्यात कणकवली, वैभववाडी आचिर्णे परीसराला अवकाळी पावसाने झोडपले. तासभर आचिर्णे परिसरात मुसळधार पाऊस पडला. या अवकाळी पावसासोबत गाराही पडल्या. या गारा गोळा करण्यासाठी शाळकरी विद्यार्थ्यांची झुंबड उडाली होती. कणकवली तालुक्यातील फोंडाघाट गावासह परिसरात अवकाळी पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. गुरुवारी सायंकाळी 4च्या सुमारास फोंडाघाटमध्ये अवकाळी पावसाला सुरुवात झाली. अचानक आलेल्या पावसामुळे सर्वांचीच तारांबळ उडाली होती.
बागायती क्षेत्र धोक्यात
या अवकाळी पावसामुळे आंबा, काजू पिकावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात सध्या हापूसला फळ यायला लागली आहेत. तर काजूला मोहोर आला असून अनेक भागात काजू पिकू लागला आहे. या अवकाळी पावसाचा परिणाम जिल्ह्यातील बागायती क्षेत्रावर होणार असून बागायतदार त्यामुळे चांगलेच अडचणीत आले आहेत.
आंबा, काजू बागायतदार हवालदिल
कणकवली तालुक्यात काही भागांमध्ये गुरुवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावली. अवकाळी पावसामुळे आंबा व काजू मोहोरावर मोठा परिणाम होणार असून, त्यामुळे बागायतदार हवालदिल झाले आहेत. विजांच्या लखलखाटासह पावसाने हजेरी लावली. कोरोना नंतर आता आंबा काजू बागायतदारांवर अवकाळी पावसाचे संकट उभे राहणार आहे.
मुलांनी घेतला गारा वेचण्याचा आनंद
पावसात गारा पडल्याने शाळकरी मुलांनी या गार वेचण्याचा आनंद लुटला. जिल्ह्यात अवकाळी पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. आज सकाळपासून वातावरण बदलून गेले होते. संध्याकाळी पडलेल्या पावसाने गारांचा वर्षाव केल्याने शाळकरी मुलांना वेगळाच आनंद घेता आला.