सिंधुदुर्ग -जिल्ह्यातील शिवसेनेचे लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी कोरोनाशी लढा देण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला १ कोटीचा निधी देणार असल्याची माहिती सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली. कणकवली येथे संयुक्त पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. यावेळी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत उपस्थित होते.
३ मे पर्यंत गोव्यातील एकही पर्यटक सिंधुदुर्गात घेणार नाही - पालकमंत्री सामंत
गोवा राज्य कोरोनामुक्त असले तरीही ३ मे पर्यंत गोव्यातील एकही पर्यटक सिंधुदुर्गात घेणार नाही,असे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले आहे. सिंधुदुर्गातील सरकारी कर्मचारी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला एक दिवसाचे वेतन देण्यास तयार आहेत. एप्रिल महिन्याचे पूर्ण वेतन मिळाल्यानंतर कर्मचारी एका दिवसाचे वेतन देणार आहेत. लॉकडाऊन काळात राज्यांच्या आणि जिल्ह्याच्या सीमा बंद आहेत. आजपासून सिंधुदुर्गातील नागरी भागात अपूर्ण रस्ते तर ग्रामीण भागात नवीन आणि अपूर्ण रस्त्यांची कामे सुरू झाली आहेत. पूल, साकव बांधणी, घरदुरुस्तीसाठी लागणारे चिरे, खडी, वाळू, सिमेंट यांची वाहतूक सुरू झाली आहे. कोरोना काळात सिंधुदुर्गातील खाजगी डॉक्टरांसोबत एमओयु तत्वावर काम करण्याबाबत विचार करणार असल्याचेही पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले आहे.
सेनेमुळे दलालांच्या कचाट्यातून आंबा बागायतदारांची सुटका - खासदार राऊत
कोरोनाच्या काळात जिल्ह्यातील आंबा बागायतदारांना शिवसेनेने साथ दिली असून हापूस परदेशातही निर्यात झाला आहे. ऑनलाइन खरेदी-विक्रीमुळे यंदा हापूस आंब्याची ग्राहकांपर्यंत थेट विक्री झाली आहे. शिवसेनेच्या माध्यमातून मुंबई, पुणे, सांगली भागात हापूसची विक्री झाली असून दलालांच्या कचाट्यातून आंबा बागायतदारांची सुटका झाली आहे. मच्छीमारांना किसान क्रेडिट योजनेसह केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देणार असल्याचे खासदार विनायक राऊत यांनी सांगितले.
१२० रुपयाच्या खाली काजू विकू नयेत - सतीश सावंत
जिल्हा बँकेने जाहीर केल्यानुसार काजू बी खरेदीसाठी कॅश क्रेडिट द्यायला सुरुवात केली असून दोडामार्गमध्ये १२० रु किलो दराने होणार काजू बी खरेदीला सुरवात झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील काजू बागातदार शेतकऱ्यांनी किलो १२० रुपयाच्या खाली काजू विकू नयेत, असे जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी सांगितले. ठाकरे सरकारच्या शेतकरी कर्जमाफी योजनेमुळे सिंधुदुर्गातील ३५ कोटींचे थकीत कर्ज माफ झाले असून सिंधुदुर्गातील नियमित कर्जपरतावा करणाऱ्या शेतकऱ्यांना ५२ कोटींचे प्रोत्साहन अनुदान मिळणार असल्याचे यावेळी सावंत म्हणाले.
पोलिसांवर हात उचलणे अयोग्य - आमदार वैभव नाईक
लॉकडाऊनच्या काळात सर्वसामान्य जनतेसह शिवसेना पदाधिकाऱ्यांनीही पोलिसांना सहकार्य केले आहे. लॉकडाऊनचा भंग केल्याबद्दल शिवसेनेच्या तालुकाप्रमुख आणि नगरसेवकालाही पोलिसांनी प्रसाद दिला. मात्र आम्ही तक्रार न करता पोलिसांना सहकार्य केले. कणकवलीत मात्र पोलिसांवर हात उचलण्याचा प्रकार घडला असून हे कृत्य चांगले नाही असे सांगत आमदार वैभव नाईक यांनी नाव न घेता कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर टीका केली. यावेळी शिवसेना नेते संदेश पारकर, संजय पडते, जान्हवी सावंत, राजू शेट्ये, शैलेश भोगले, सुशांत नाईक, सचिन सावंत, राजू राठोड आदी उपस्थित होते.