सिंधुदुर्ग- शिवसेनेला कोकणातून कायमचे हद्दपार करण्याची घोषणा केल्या नंतर सिंधुदुर्गात आता राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संजय पडते आणि जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत कोकणातील जनतेने नारायण राणे आणि त्यांच्या कुटुंबाला चार वेळा कोकणातून हद्दपार केले आहे. त्यांना हद्दपार करून सिंधुदुर्गातील जनता आता कंटाळली असल्याचे सांगत राणेंवर शाब्दिक हल्ला चढवला आहे.
राणे ज्या पक्षात गेले आहेत, त्या पक्षाचे जुने कार्यकर्तेच नारायण राणेंना या जिल्ह्यातून राजकीय दृष्ट्या निश्चितच हद्दपार करतील, असेही हे दोघे म्हणाले. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विकास सावंत उपस्थित होते. विशेष म्हणजे, एके काळी राणेंचे निष्ठावंत म्हणून या दोघांचीही ओळख होती.