सिंधुदुर्ग - कोविड महामारीचा लाभ घेऊन काही बोगस डॉक्टर्स चुकीचे उपचार करण्याची शक्यता आहे. अशा डॉक्टरांना शोधून त्यांच्यावर कारवाई करावी. विशेषतः वैभववाडी आणि दोडामार्ग या ठिकाणी लक्ष केंद्रीत करावे. गेल्या तीन वर्षात विविध कारणांनी झालेल्या मृत्यूंचा रुग्णालयनिहाय अहवाल सादर करावा, असे निर्देश पालकमंत्री उदय सामंत यांनी आज दिले. गेल्या तीन वर्षात विविध कारणांनी जिल्ह्याचा मृत्यू दर कसा होता याचा देखील अहवाल बनवा, असे देखील सामंत यांनी सांगितलं.
बोगस डॉक्टर्स शोधून कारवाई करा - उदय सामंत - uday samant on sindhudurg death
कोविड महामारीचा लाभ घेऊन काही बोगस डॉक्टर्स चुकीचे उपचार करण्याची शक्यता आहे. अशा डॉक्टरांना शोधून त्यांच्यावर कारवाई करावी, असे निर्देश पालकमंत्री उदय सामंत यांनी आज दिले.

आठवडानिहाय जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट, लसीकरण, मृत्यू दर, बरे होऊन घरी गेलेले रुग्णसंख्या याबाबतची माहिती घेऊन पालकमंत्री म्हणाले, चाचण्यांचे प्रमाण अजूनही वाढवा. त्याचबरोबर लसीकरणावरही भर द्या. अशा, अंगणवाडी सेविका, त्याचबरोबर परिचारिका यांना आवश्यक असणारी साधनसामुग्री वेळच्या वेळी द्यावी. गेल्या तीन वर्षात विविध कारणांनी जिल्ह्याचा मृत्यू दर कसा होता, याबाबतचा एक अहवाल सादर करावा. यामध्ये खासगी रुग्णालयातून जिल्हा रुग्णालयाकडे उपचारासाठी आलेल्या रुग्णांची संख्या आणि त्यांना असणारे अजार, याबाबतचा समावेश असावा. असेही पालकमंत्री म्हणाले.
कणकवली तहसील कार्यालयात पालकमंत्री सामंत यांनी कोविड 19 प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि लसीकरणबाबत आढावा बैठक घेतली. या बैठकीला खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे, सहायक जिल्हाधिकारी संजिता महोपात्रा, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील आदी उपस्थित होते.
दोडा मार्ग आणि वैभववाडीमध्ये लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना
कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात विशेषतः दोडामार्ग आणि वैभववाडीमध्ये काही बोगस डॉक्टर्स वैद्यकीय उपचार करण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा डॉक्टरांना शोधून त्यांच्यावर कारवाई करावी, असेही ते म्हणाले. बोगस डॉक्टरांचे सर्वेक्षण करण्याबाबत सूचना करून खासदार राऊत म्हणाले, आयुष रुग्णालयात दोन वर्ग खोल्या करण्याबाबत आरोग्य विभागाने लक्ष द्यावे. त्याचबरोबर लसीकरणावरही भर द्यावा. रुग्णांच्या नातेवाईकांवर खासगी रुग्णालयाकडून बिलांची जादा आकारणी होऊ नये याबाबत नियुक्त करण्यात आलेल्या लेखाधिकाऱ्यांकडून बिले कमी केल्याबाबतची माहिती घ्या, असेही त्यांनी सांगितले.
कणकवली परबवाडी येथे कोविड 19 चा डेल्टा प्लस बाधीत रुग्ण
जिल्ह्यात कोविड 19 आजाराचा नवीन स्ट्रेन ( डेल्टा प्लस ) कणकवली परबवाडी येथे सापडला असून, बाधीत भागात आयसीएमआरच्या मार्गदर्शक सूचनेनुसार उपाययोजना राबविण्यात येत असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी या बैठकीत दिली. जिल्ह्यातील हा पहिलाच रुग्ण असल्याचे त्यांनी सांगितले. तर जिल्ह्यात आतापर्यन्त म्यूकरमायकोसिसचे ८ रुग्ण सापडले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.