सिंधुदुर्ग - तौक्ते चक्रीवादळाच्या तडाख्यातून सावरत असताना कोरोनाचे संकट इथल्या मच्छीमारांसमोर उभे राहिले. कोरोनामुळे कडक लॉकडाऊनमध्ये वेळोवेळी मासेमारीवर घातली गेलेली बंदी, त्यात निसर्ग नंतर तौक्ते चक्रीवादळाने उद्धवस्थ केलेली किनारपट्टी. यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मच्छिमार पुरता बेजार झाला आहे. चार महिने मासेमारी आणि त्यातून मिळालेल्या उत्पन्नात आठ महिने आपल्या संसाराचा गाडा हाकणाऱ्या येथील मच्छिमारासमोर आता मान्सूनच्या तोंडावर काय करावं, हा प्रश्न निर्माण झाला आहे.
मासेमारीवर अवलंबून आहे सिंधुदुर्गाच्या किनाऱ्यावरील लोकवस्ती..
सिंधुदुर्ग जिल्ह्याला 121 किलोमीटरची किनारपट्टी लाभली असून 20 हजार मेट्रिक टनाच्या जवळपास मासेमारी केली जाते. जिल्ह्यात मासळी उतरवून घेणारी 38 केंद्रे आहेत. किनारपट्टी भागातील 30 हजार कुटुंब प्रत्यक्ष मासेमारीवर अवलंबून आहे. तर या व्यवसायामुळे 15 हजार कुटुंबाला अप्रत्यक्ष रोजगार मिळतो. जिल्ह्यात मच्छीमार सहकारी संस्था 34 असून एकूण सभासद संख्या 14 हजार 216 एवढी आहे. मान्सून तोंडावर आला आहे. शासनाने १ जूनपासून मासेमारी बंदीचा आदेश जरी केला आहे. मालवण हे मच्छिमार व्यवसायाचे केंद्र आहे. या ठिकाणच्या मच्छिमार बांधवांशी चर्चा केल्यानंतर येथील समस्यांची भीषणता समोर येते.
कोरोना आणि चक्रीवादळाच्या तडाख्यात अडकला सिंधुदुर्गतील मच्छिमार.. वादळात मोठ्याप्रमाणावर झाले जाळी व होड्यांचं नुकसान..
मालवण तालुक्यातल्या देवबाग येथील मच्छिमार कॅलिस डिसोझा सांगतात कि, कोरोना काळात लॉकडाऊनमध्ये आम्ही बाहेर पडू शकलो नाही. मच्छिमारी हा आमचा व्यवसाय आहे. लॉकडाऊनमध्ये मासेमारीसाठी किंवा मासे विक्रीसाठी आम्ही बाहेर पडलो तर आमच्यावर पोलीस आणि इतर यंत्रणांची कारवाई होत होती. यामुळे आम्हाला आमचा व्यवसाय करताच आला नाही. त्यामुळे उदरनिर्वाहासाठी लागणारे पैसे आम्हाला कमवताच आले नाहीत. त्यात तौक्ते चक्रीवादळ आलं या वादळामुळे आमच्या होड्यांच नुकसान झालं आहे. आता यातून मार्ग काढायचा कसा, हा आमच्यासमोर प्रश्न आहे.
मासेमारी शिवाय आमच्याकडे दुसरं काही नाही..
देवबाग ख्रिश्चन वाडीतील येथील दुसरे मच्छिमार फ्रान्सिस फर्नांडिस सांगतात की, मच्छिमारी हाच आमचा व्यवसाय आहे. याशिवाय आमच्याकडे दुसरं काही नाही. चार महिने व्यवसाय करायचा आणि आठ महिने आपलं घर-कुटुंब सांभाळायचं असं आमचं जगणं आहे. मी एकटाच कमावतो आणि घरातील पाच ते सहा माणसं मी पोसतो. इथल्या सर्वांचीच कमी जास्त प्रमाणात हीच स्थिती आहे. परंतु आधी कोरोना आणि आता चक्रीवादळ यात आम्ही पूर्णपणे उद्धवस्त झालो आहोत. आता तर मान्सून तोंडावर आला आहे. आमच्याकडे घारापुरती जागा असल्याने आम्ही पर्यटन व्यवसायाकडे जाऊ शकत नाही. दुसरं तुम्ही रस्ते बांधाल, हॉटेल बांधाल परंतु येथे किनारपट्टी राहिलीच नाही तर याठिकाणी येणार कोण? आणि त्या हॉटेलमध्ये राहणार कोण? त्यासाठी इथे आधी संरक्षण बंधारा करावा, असेही ते म्हणाले.
मच्छिमारांचा यावर्षीचा हंगाम पूर्णतः मासेमारीशिवाय..
सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगड, मालवण, वेंगुर्ला हे तालुके समुद्र किनारी भागात आहेत. 2018 पासून समुद्रात वेगवेगळी चक्रीवादळं येत आहेत. त्यामुळे येथील मच्छिमार आधीच बेजार झालेले असताना आता कोरोनाचे वाढत जाणाऱ्या संकटात मच्छिमारांचा यावर्षीचा हंगाम पूर्णतः मासेमारिशिवाय गेला आहे. त्यामुळे समुद्राच्या लाटांशी झुंज घेणाऱ्या मच्छिमारांसमोर कर्जबाजारी पणाचे मोठे संकट उभे ठाकले आहे. आता तर मान्सून तोंडावर आला आहे. मच्छिमारसमोर निसर्ग संकटाचे नवे पर्व सुरू होणार आहे. त्यामुळे शासन मच्छिमारांच्या या समस्यांकडे कसे लक्ष देते आणि येथील मच्छिमाराला पुन्हा उभा करण्यासाठी काय करते याकडे हे पाहणं महत्वाचं आहे.