सिंधुदुर्ग - शिवसेना आणि नारायण राणे संघर्षात प्रतिष्ठेची झालेली जिल्हा बँक निवडणुकीचा निकाल आज ( Sindhudurg District Bank Result ) जाहीर झाला. केंद्रीय मंत्री नारायण राणे ( Central Minister Narayan Rane ) यांनी गड जिंकत 19 पैकी आतापर्यंत 11 जागांवर भाजपा तर 8 जागांवर महाविकासआघाडीचे सदस्य निवडणून आले. विशेष म्हणजे या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष महाविकास आघाडीचे पॅनल प्रमुख सतीश सावंत आणि भाजपाचे पॅनल प्रमुख माजी आमदार राजन तेली यांचा पराभव झाला आहे. बँकेचे विद्यमान उपाध्यक्ष सुरेश दळवी यांचा देखील पराभव झाला. सतीश सावंत यांचे प्रचार प्रमुख संतोष परब यांच्यावरील खुनी हल्ल्याने ही निवडणूक गाजली. या प्रकरणी अद्यापही संशयित आरोपी आमदार नितेश राणे अद्यापही फरार आहेत.
विद्यमान अध्यक्षांना नशिबाने दगा दिला -
विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत व त्यांच्याविरोधात असलेले उमेदवार विठ्ठल देसाई या दोघांनाही समसमान मते पडली. त्यामुळे चिठ्ठी उडवून निर्णय घेण्यात आला. यामध्ये जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचा पराभव झाला. तर विठ्ठल देसाई विजयी झाले आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूकीच्या शेती विकास संस्था कणकवली तालुका मतदारसंघात भाजपाच्या विठ्ठल देसाई आणि महाविकास आघाडीचे विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत यांच्यात झालेली लढत समसमान झाली. दोघांनाही 17 मते पडली. यावेळी केवळ नशिबाच्या जोरावर विठ्ठल देसाई यांनी विजय संपादन केला असून भाजपने जोरदार घोषणाबाजी करत आनंद साजरा केला आहे.
परब खुनी हल्ला संशयित आरोपीचा विजय
दरम्यान संतोष परब हल्ला प्रकरणी संशयित असलेले वेंगुर्ल्याचे तालुकाध्यक्ष मनीष दळवी विजयी झाले असून त्याठिकाणी काँग्रेसचे कार्याध्यक्ष विलास गावडे पराभूत झाले आहेत. तसेच भाजपा पॅनल प्रमुख माजी आमदार राजन तेली पराभूत झाले आहेत.
मतदारसंघनिहाय विजेत्यांची नावे -
- पतसंस्था मतदारसंघात महाविकास आघाडीच्या सुशांत नाईक यांनी भाजपाच्या राजन तेली यांचा पराभव केला आहे. माजी आमदार राजन तेली हे भाजपाचे जिल्हाध्यक्ष असून ते भाजप प्रणित सिद्धिविनायक सहकार पॅनलचे प्रमुख आहेत.
- पणनसंस्था मतदारसंघात भाजपाच्या अतुल काळसेकर यांनी महाविकास आघाडीच्या सुरेश दळवी यांचा पराभव केला आहे.
- दुग्ध व मच्छीमार संस्था मतदारसंघात भाजपाच्या महेश सारंग यांनी महाविकास आघाडी च्या मधुसूदन उर्फ एम.के.गावडे यांचा पराभव केला आहे.
- गृह बांधणी देखरेख संस्था मतदारसंघात भाजपाच्या संदीप उर्फ बाबा परब यांनी महाविकास आघाडी च्या विनोद मर्गज यांचा पराभव केला आहे.
- शेती विकास संस्था वेंगुर्ले तालुका मतदारसंघात भाजपाच्या मनीष दळवी यांनी महाविकास आघाडीच्या विलास गावडे यांचा पराभव केला आहे.
- शेती विकास संस्था वैभववाडी तालुका मतदारसंघात भाजपाच्या दिलीप रावराणे यांनी महाविकास आघाडीच्या दिगंबर पाटील यांचा पराभव केला आहे.
- शेती विकास संस्था मालवण तालुका मतदारसंघात महाविकास आघाडीच्या व्हिक्टर डांटस यांनी भाजपाच्या कमलाकांत उर्फ बाळू कुबल यांचा पराभव केला आहे.
- शेती विकास संस्था दोडामार्ग तालुका मतदारसंघात महाविकास आघाडीच्या गणपत देसाई यांनी भाजपाच्या प्रकाश गवस यांचा एका मताने पराभव केला आहे.
- वैयक्तिक / इतर संस्था मतदारसंघात भाजपाच्या ऍड. समीर सावंत यांनी महाविकास आघाडी च्या विकास सावंत यांचा पराभव केला आहे.
- अनुसूचित जाती / जमाती संस्था मतदारसंघात महाविकास आघाडीच्या आत्माराम ओटवणेकर यांनी भाजपाच्या सुरेश चौकेकर यांचा पराभव केला आहे.
- मजूर संस्था मतदारसंघांमध्ये भाजप प्रणित उमेदवार गजानन गावडे यांना 110 तर महा विकास आघाडीचे लक्ष्मण आंगणे यांना 85 मते मिळाली
- कुडाळ तालुक्यामध्ये भाजपप्रणीत प्रकाश मोर्ये यांना 15 महा विकास आघाडीचे विद्या प्रसाद बांदेकर यांना 20 मते मिळून झाले विजयी. या ठिकाणी तिसरे अपक्ष उमेदवार सुभाष मडव यांना १ मत मिळालेला आहे
- देवगड तालुक्यामध्ये भाजप प्रणित श्री प्रकाश बोडस यांना 19 मते मिळून विजय. तर महा विकास आघाडीचे अविनाश माणगावकर यांना सतरा मते मिळून पराजय.
- भटक्या विमुक्त जाती – जमाती / विशेष मागास प्रवर्ग संस्था मतदारसंघात महाविकास आघाडीच्या मेघनाद धुरी यांनी भाजपाच्या गुलाबराव चव्हाण यांचा पराभव केला आहे.