सिंधुदुर्ग -निसर्ग चक्रीवादळाचा फटका जिल्ह्यातही बसला आहे. वादळासोबत सर्वत्र मुसळधार पाऊस कोसळला. अनेक ठिकाणी घरांवर झाडे पडल्याने मोठे नुकसान झाले. मात्र, दोडामार्ग तालुक्यात कोठेही नुकसान झालेले नाही. तसेच निसर्ग चक्रीवादळामुळे जिल्ह्यात कुठेही जीवितहानी झालेली नाही, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या मुख्य कार्यकारी अधिकारी शुभांगी साठे यांनी दिली.
जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 71.87 मि. मी. च्या सरासरीने एकूण 575 मि. मी. पाऊस झाल्याची नोंद झाली आहे. यामध्ये मालवण तालुक्यात सर्वाधिक 110 मि. मी. तर वैभववाडी तालुक्यात सर्वात कमी 24 मि. मी. पाऊस झाला आहे. वादळामुळे जिल्ह्यात खासगी मालमत्तेची लाखोंची हानी झाली आहे. तर नुकसानीचे पंचनामे सुरु आहेत.
जिल्ह्यातील सात तालुक्यांत नुकसान -
कणकवली तालुक्यात डामरे येथे विनायक पारकर यांच्या राहत्या घरावर झाड पडून नुकसान झाले. तळवणे येथे झाडे पडून तीन घरांचे नुकसान झाले. वेंगुर्ले तालुक्यात नारायण मेस्त्री (रा. मातोंड) यांच्या घरावर झाड पडून 15 हजार रुपयांचे तर गोपाळ गावडे (रा. वजराट) यांच्या घरावर झाड पडून 4 हजार रुपयांचे नुकसान झाले. कुडाळ तालुक्यात विजय नाईक (रा. मळेवाड) यांच्या घराचे पत्र उडून 2 हजाराचे नुकसान झाले. तसेच मालवण तालुक्यात आचरा येथील सुरेश परब यांच्या घराचेही पत्रे उडाली.
तर आचरा बागवाडी येथेही झाड पडून सुदेश सारंग यांच्या घरासमोरील पत्र्यांच्या शेडचे नुकसान झाले. रत्नप्रभा सावंत (तळगाव-काठापूरवाडी) यांच्या घरावर, दीपक पाटणकर (चिंदर-भटवाडी) यांच्या घरावर झाड पडून नुकसान झाले. देवगड तालुक्यात संतोष परब यांच्या घरावर माडाचे झाड पडून 1 लाख 10 हजाराचे नुकसान आदी. ठिकाणी घरावर झाड पडून नुकसान झाले आहे.
यासोबत सिंधुदुर्ग किल्ल्यातील झाड पडून वीज खांबाचे नुकसान झाले. दाभोली मोबारवाडी येथील वीज वाहिनीवर झाड पडले. तर करुळ व कळसुली येथे एका घरावर झाड पडल्याने मोठे नुकसान झाले.
जिल्ह्यात झालेला पाऊस -
जिल्ह्यात 24 तासांत पडलेला पाऊस व 1 जूनपासून आतापर्यंत पडलेला पाऊस. सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग 84 (169), सावंतवाडी 84 (138), वेंगुर्ले 103 (133.6), कुडाळ 67 (100), मालवण 110 (147), कणकवली 25 (55), देवगड 78 (94), वैभववाडी 24 (95) असा आहे.
तिलारी आंतरराज्य प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात 24 तासात 86.200 मि. मी. पाऊस झाला. तर देवघर प्रकल्प क्षेत्रात 26.50 मि. मी., कोर्ले-सातंडी क्षेत्रात 29.00 मि. मी. आणि अरुणा प्रकल्प क्षेत्रात 50.20 मि. मी. पाऊस झाला.
जिल्ह्यातील पाटबंधारे प्रकल्पांमधील पाणीसाठा -
जिल्ह्यातील मोठय़ा, मध्यम आणि लघु पाटबंधारे प्रकल्पांमध्ये उपलब्ध पाणीसाठ्याची माहिती प्राप्त झाली आहे. तिलारी आंतरराज्य प्रकल्पामध्ये 215.8900 द. ल. घ. मी. पाणीसाठा आहे. सध्या तिलारी प्रकल्प 48.26 टक्के भरलेला आहे.