सिंधुदुर्ग - निसर्ग चक्रीवादळाचा फटका जिल्ह्यालाही बसला आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी घरांवर झाडे पडल्याने मोठे नुकसान झाले. वादळासह मुसळधार पाऊसही सर्वत्र कोसळला. 24 तासांत जिल्ह्यात 71.87 मि. मी च्या सरासरीने एकूण 575 मि. मी. पाऊस झाल्याची नोंद झाली आहे.
मालवण तालुक्यात सर्वाधिक 110 मि.मी तर वैभववाडी तालुक्यात सर्वात कमी 24 मि. मी. पाऊस झाला आहे. जिल्ह्यात मालमत्तेची लाखोंची हानी झाली आहे. नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत.
सात तालुक्यांत नुकसान
जिल्ह्यातील कणकवली तालुक्यात डामरे येथे एका घरावर झाड पडून नुकसान झाले. तळवणे येथे झाडे पडून 3 घरांचे नुकसान झाले आहे. वेंगुर्ले तालुक्यात दोन घरांवर झाड पडून नुकसान झाले आहे. कुडाळ आणि मालवण तालुक्यात घराच्या पत्र्याचे छत उडाले. तर, दोन घरांवर झाडे पडून नुकसान झाले, देवगड तालुक्यात संतोष परब यांच्या घरावर माडाचे झाड पडून 1 लाख 10 हजारांचे नुकसान झाले, इतर ठिकाणीही घरांवर झाडे पडली.
दोडामार्ग तालुक्यात कोठेही नुकसान झालेले नाही. निसर्ग चक्रीवादळामुळे जिल्ह्यात कोठेही जीवितहानी झालेली नाही, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या मुख्य कार्यकारी अधिकारी शुभांगी साठे यांनी दिली आहे. तसेच, सिंधुदुर्ग किल्ल्यातील झाड पडून वीज खांबाचे नुकसान झाले आहे. दाभोली मोबारवाडी येथील वीज वाहिनीवर झाड पडून नुकसान झाले असून करूळ व कळसुली येथे एका घरावर झाड पडल्याने मोठे नुकसान झाले आहे.
जिल्ह्यात 24 तासांत पडलेला पाऊस
दोडामार्ग 84 मिमी, सावंतवाडी 84 मिमी, वेंगुर्ले 103 मिमी, कुडाळ 67 मिमी, मालवण 110 मिमी, कणकवली 25 मिमी, देवगड 78 मिमी, वैभववाडी 24 मिमी असा आहे. तिलारी आंतरराज्य प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात 24 तासांत 86.200 मि.मी. पाऊस झाला, तर देवघर प्रकल्प क्षेत्रात 26.50 मिमी, कोर्ले-सातंडी क्षेत्रात 29.00 मिमी आणि अरुणा प्रकल्प क्षेत्रात 50.20 मिमी पाऊस झाला आहे.