सिंधुदुर्ग - कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर पावसाळ्यामध्ये उद्भवणाऱ्या आपत्तीचा सामना करण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी साधनसामग्रीसह सज्ज रहावे. रेल्वे, रस्ते वाहतूक, महामार्गाची अपूर्ण कामे त्वरित पूर्ण करावीत, अशा सूचना जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी येथील जिल्हा नियोजन समितीच्या जुन्या सभागृहामध्ये आयोजित केलेल्या मान्सून पूर्वतयारी आढावा बैठकीत केल्या.
या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर, निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, उपविभागीय अधिकारी सुशांत खांडेकर, वंदना खरमाळे, वैशाली राजमाने तसेच शासकीय व जिल्हा परिषदेचे सर्व संबंधित खातेप्रमुख उपस्थित होते.
प्रत्येक तालुक्याच्या तालुकास्तरीय आपत्ती व्यवस्थापन समितीच्या त्वरित बैठका घेऊन आपत्ती व्यवस्थापन आराखडा अद्ययावत करावा, सर्व संबंधित विभागांनी नियंत्रण कक्ष 1 जूनपासून कार्यान्वित करावा, घाट मार्गावर कोसळणारी दरडबाबतची माहिती तातडीने मिळावी व त्या हटवता याव्यात, तसेच रस्त्यावर पडणारी झाडे, मुख्यतः आंबोली घाटामध्ये त्वरित हटवता यावीत यासाठी महसूल, वन व सार्वजनिक बांधकाम विभागांनी समन्वय ठेवावा. शोध व बचाव साहित्य अद्ययावत ठेवावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.