महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'कोरोना रोखण्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा राज्यातील पहिल्या पाचमध्ये' - sindhudurg corona situation

कोरोनावर नियंत्रण ठेवता आले तरी कोरोना विरुद्धची लढाई संपलेली नाही. शासनाने जाहीर केल्याप्रमाणे माझी जबाबदारी ओळखून प्रत्येकाने कोविडचे नियम पाळावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी केले आहे.

k manjulakshmi
k manjulakshmi

By

Published : Mar 25, 2021, 3:01 PM IST

Updated : Mar 25, 2021, 4:28 PM IST

सिंधुदुर्ग - कोरोना विरुद्धच्या लढाईला एक वर्ष झाले. या एक वर्षात सिंधुदुर्ग जिल्ह्याने कोरोना रोखण्यात फार मोठे यश मिळविले. राज्यातील पहिल्या पाच जिल्ह्यात सिंधुदुर्ग जिल्ह्य आहे. हे यश मिळवताना आशा सेविका, अंगणवाडी सेविका, पोलीस व आरोग्य यंत्रणा, विविध सामाजिक संस्थांनी खूप चांगले काम आणि सहकार्य केले. त्यामुळेच कोरोनावर नियंत्रण ठेवता आले, अशी प्रतिक्रिया सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी दिली आहे.

'लढाई अजूनही संपलेली नाही'

कोरोनावर नियंत्रण ठेवता आले तरी कोरोना विरुद्धची लढाई संपलेली नाही. शासनाने जाहीर केल्याप्रमाणे माझी जबाबदारी ओळखून प्रत्येकाने कोविडचे नियम पाळावेत, 60 वर्षावरील वयोवृद्धांनी आणि 45 ते 59 वर्ष वयोगटातील व्याधीग्रस्त लोकांनी कोरोना प्रतिबंधात्मक लस घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी केले आहे.

'जिल्ह्यात सध्यातरी लॉकडाऊनची गरज नाही'

विदर्भातल्या जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्ण वाढत असल्यामुळे लॉकडाउन करण्याची वेळ आली आहे. मात्र अशी स्थिती सिंधुदुर्ग जिल्ह्यात नाही. त्यामुळे आपल्याकडे लॉकडाऊन करण्याची परिस्थिती आली नाही. तरीदेखील येथील नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे. कोणत्याही कारणाने कोरोना पुन्हा एकदा वाढणार नाही याची खबरदारी जिल्ह्यातील नागरिकांनी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

'तपासणी करायला आजही लोक समोर येत नाहीत'

मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे प्रत्येकाने माझी जबाबदारी या वाक्याप्रमाणे स्वतःची काळजी घेतली पाहिजे. म्हणजेच स्वतःची जबाबदारी पार पाडली पाहिजे. सार्वजनिक ठिकाणी जाताना मास्क वापरला पाहिजे. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळले पाहिजे. कोरोणाच्या बाबतीत घालून दिलेल्या नियमांचे, अटींचे पालन केले पाहिजे, असे सांगताना लोकांनी आपली तपासणी करून घ्यायला पुढे आले पाहिजे, असेही त्या म्हणाल्या. लोक टेस्टिंग करायला टाळाटाळ करतात. आपण कुठेही बाहेर जाऊन आलात किंवा बाहेरून येणाऱ्या व्यक्तीने स्वतःहून पुढे येऊन कोरोना तपासणी करून घेण्याची गरज आहे, असेही त्या म्हणाल्या.

'कोरोनाच्या प्रोटोकॉलचे पालन करा'

आपल्या जिल्ह्यामध्ये कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू आहे. याचा लाभ जिल्ह्यातील नागरिकांनी घेतला पाहिजे. जवळच्या केंद्रावर जाऊन स्वतःहून लस घेतली पाहिजे, असे आवाहन यावेळी जिल्हाधिकारी यांनी केले आहे. कोरोनाच्या बाबतीत सरकारने घालून दिलेले प्रोटोकॉल पाळतानाच आपला जिल्हा कोरोनामुक्त करण्यासाठी सर्वच नागरिकांनी सहकार्य केले पाहिजे. आपल्या जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी राखण्यासाठी जिल्ह्यातील नागरिकांनीही चांगले सहकार्य केले आहे. वेळोवेळी दिलेल्या सूचना आणि आदेशांचे जिल्हावासीयांनी पालन केले आहे. यापुढेही असेच सहकार्य जिल्हावासीयांनी द्यावे, असे आवाहन यावेळी त्यांनी केले आहे.

Last Updated : Mar 25, 2021, 4:28 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details