सिंधुदुर्ग- जिल्ह्यातील बहुचर्चित चिपी विमानतळ सुरू करण्याच्या हालचालींना प्रशासकीय पातळीवरून वेग आला आहे. एअर इंडियाचे अध्यक्ष, सिव्हील एविएशनचे सचिव प्रदिप सिंह खरोला यांनी आयआरबी कंपनीला लेखी पत्राद्वारे 26 जानेवारी पूर्वी सर्व कामे पूर्ण करून घ्या, असे निर्देश दिले आहेत. याबाबतची माहिती खरोला यांनी खासदार विनायक राऊत यांनाही लेखी पत्राद्वारे कळविली असून सिंधुदुर्ग विमानतळावरून विमान उड्डाणाचा दिवस आता जवळ येतोय, अशी खासदार राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
8 डिसेंबर 2020 रोजी झालेल्या अंदाज समितीच्या बैठकीत खासदार विनायक राऊत यांनी चिपी विमानतळ सुरू करण्याबाबत लक्ष वेधले होते. त्या बैठकीतील चर्चेनंतर खरोला यांनी महाराष्ट्र राज्य सरकारच्या अधिकार्यांसमवेत चिपी विमानतळ प्रकल्पाचा आढावा घेतला होता. यावेळी बोलताना खासदार विनायक राऊत म्हणाले एलायन्स एअर विमान कंपनी लवकरच या विमानतळाची पाहणी करेल. शिवाय इंडिगो विमान कंपनी देखील या विमानताळकरून सिंधुदुर्ग ते दिल्ली असे उड्डाण करायला इच्छुक आहे. ही विमानसेवा सुरू झाल्यानंतर जिल्ह्यातील लोकांना केवळ 2500 रुपयात मुंबईचा प्रवास करता येणार आहे, असे ते म्हणाले.
26 जानेवारीपूर्वी कामे पूर्ण करण्याचे दिले निर्देश
नागरी उड्डाण मंत्रालयाने नागरी उड्डाण महासंचालनालय (डीजीसीए) आणि भारतीय विमानतळ प्राधिकरण (एएआय) यांना आवश्यक कार्यवाही करण्यासाठी आणि विमानतळ परवाना धारकास (आयआरबी कंपनी) विमानतळ परवान्यासह सुविधा देण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच एलायन्स एअर विमान कंपनीने विमानाचे वेळापत्रक निश्चित करावे, असे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता 26 जानेवारी 2021 ला चिपी विमानतळ सुरू करण्याचे जवळपास निश्चित झाले आहे.
विमानतळाच्या विकासासाठी ५२० कोटी रुपये खर्च
दरम्यान, उडान ३.१ अंतर्गत देशभरातील अनेक दुर्गम भागांतील विमानतळांचा समावेश आहे. त्यामध्ये काही पूर्वोत्तर राज्यांमधील विमानतळही आहेत. कोकणातील चिपी आणि रत्नागिरी हे दोन विमानतळही नीम दुर्गम श्रेणीतील आहेत. त्यामुळेच या विमानतळांवरून प्रवासी मिळतील की नाही, याची कंपन्यांना धास्ती वाटत आहे. एलायन्स एअर विमान कंपनी शिवाय विमानसेवा पुरवठादार कंपन्यांची अद्याप घोषणा झालेली नाही. या विमानतळाच्या विकासासाठी ५२० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. ४०० प्रवासी क्षमतेची टर्मिनल इमारत व २,५०० मीटर लांब व ४५ मीटर रुंद धावपट्टी या विमानतळासाठी उभारण्यात आली आहे. ही धावपट्टी साधारण १८० आसन क्षमतेपर्यंतच्या मध्यम आकाराच्या (बोइंग ७३७ व एअरबस ३२०) विमानांसाठी सक्षम आहे.