सिंधुदुर्ग -कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील अंगणवाड्या बंद आहेत. मात्र तरी देखील बालके, स्तनदा माता आणि गरोदर स्त्रियांपर्यंत अंगणवाडी सेविकेंच्या माध्यमातून पोषण आहार पोहोचवला जात आहे. शक्य असेत तर अंगणवाडीमध्ये अथवा शक्य नसल्यास पोषण आहार घरपोहोच देण्यात येत आहे. याचा फायदा जिल्ह्यातील सुमारे 40328 लाभार्थ्यांना होतो आहे. पोषण आहारामध्ये प्रोटीनयुक्त कडधान्य, धान्य, तेल आणि मसाल्यांचे पदार्थ यांचा समावेश आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण विभागाच्या माध्यमातून 1587 अंगणवाड्या चालविल्या जातात. या अंगणवाड्यांच्या माध्यमातून 40328 लाभार्थ्यांना पोषण आहाराचे वाटप केल्या जाते. या लाभार्थ्यांमध्ये 6 महिने ते 6 वर्ष वयोगटातील बालकांसोबतच स्तनदा माता, गरोदर स्त्रिया यांचा समावेश आहे. या लाभार्थ्यांमध्ये 6 महिने ते 3 वर्ष वयोगटातील 16 हजार 456 बालके, तर 3 वर्ष ते 6 वर्ष वयोगटातील 18 हजार 466 बालकांचा समावेश आहे. 2098 गरोदर स्त्रिया आणि 3307 एवढी स्तनदा मातांची गरज आहे. या लाभार्थ्यांना गहू, मसूर, डाळ, सोयाबीन तेल, चणाडाळ, हळद, मिरची पावडर, तांदूळ, मीठ या गोष्टी पोषण आहाराच्या माध्यमातून दिल्या जातात.
असे होते पोषण आहाराचे वितरण
या लाभार्थ्यांमधील 2098 गरोदर स्त्रिया आणि 3307 स्तनदा माता या लाभार्थ्यांना एकूण गहू 18 हजार 199.50 किलो, मसूर डाळ 10 हजार 478.50 किलो, मिरची पावडर 1103 किलो, हळद पावडर 1103 किलो, मीठ 2206 किलो, सोयाबीन तेल 2 हजार 757.50 लिटर, चणाडाळ 1103 किलो दिली जाते. तर तीन वर्ष ते सहा वर्ष वयोगटातील 18 हजार 466 मुलांना, चणाडाळ 27 हजार 13. 50 किलो, मसूर डाळ 25 हजार 212.69 किलो, मिरची पावडर 3 हजार 601.80 किलो, हळद पावडर 3 हजार 601.80 किलो, मीठ 7 हजार 203.60 किलो, सोयाबीन तेल 9 हजार 4 लिटर, तांदूळ 55 हजार 828 किलो दिला जातो. 6 महिने ते 3 वर्ष वयोगटातील 16 हजार 456 मुलांना 45 हजार 740.80 किलो गहू, 24 हजार 504 किलो मसूर डाळ, 3 हजार 267.20 किलो मिरची पावडर, 3हजार 267.20 किलो हळद पावडर, 6 हजार 534.49 किलो मीठ, 8 हजार 168 लिटर सोयाबीन तेल, 24 हजार 504 किलो चणाडाळ दिली जाते.
अंगणवाडी बंद तरी देखील पोषण आहार पोहोचत आहे लाभार्थ्यांपर्यंत