सिंधुदुर्ग -खासदार विनायक राऊत यांच्यावर निलेश राणे यांनी आक्षेपार्ह विधान केल्यानंतर जिल्ह्यातील शिवसैनिकांचा उद्रेक झाला आहे. आज ओरोस येथे शिवसैनिकांनी निलेश राणे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोड्याने हाणले. यानंतर त्यांच्या निषेधाच्या घोषणा देत जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्याकडे निलेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करा अशी मागणी केली आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षकांना सादर केले निवेदन
माजी खासदार निलेश नारायण राणे यांनी दिनांक ९ फेब्रुवारी रोजी एका व्हिडीओ क्लिपव्दारे शिवसेना सचिव खासदार विनायक भाऊराव राऊत यांच्या विरुद्ध अपमानास्पद प्रक्षोभक विधान करून विनायक राऊत यांना मारहाण करणार अशी धमकी दिली आहे. याप्रकरणी माजी खासदार निलेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी शिवसैनिकांनी जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे. तसेच याप्रश्नी शिवसेनेकडून काही विपरीत घडल्यास याला पोलीस प्रशासन जबाबदार असेल असा इशारा ही यावेळी दिला आहे. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, शिवसेना नेते सतीश सावंत, संदेश पारकर, अतुल रावराणे, सुशांत नाईक, महिला जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत, नीलम सावंत यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राणेंची ही संस्कृती भाजपला चालणार आहे का?
यावेळी बोलताना शिवसेना नेते संदेश पारकर म्हणाले की, निलेश राणे यांची दहशतीची भाषा हीचं राणे घराण्याची संस्कृती आहे. राणेंची ही संस्कृती भाजपाला चालणार आहे का ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. लोकसभेच्या निवडणुकीत दोन वेळा पराभव झाल्याने निलेश राणे यांचे मानसिक संतुलन बिघडल्याचे ते म्हणाले. तर राणेंच अस्थितव त्यांच्या दोन्ही मुलांनी संपविला असेही ते म्हणाले.
शिवसैनिकांच्या भावना भडकल्या तर याला निलेश राणे जबाबदार
जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत म्हणाले शिवसैनिकांच्या भावना भडकल्या तर याला निलेश राणे जबाबदार असतील. जिल्ह्यातल्या वातावरण बदलत असेल तर त्यांच्यावर जिल्हा पोलिस अधीक्षकांनी कारवाई करावी अशी आम्ही जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याकडे मागणी करत आहोत. तर जिल्हा परिषद निवडणुकीत राणेंना त्यांची जागा दाखवू असेही ते म्हणाले.
विकतच्या पदव्या घेतलेल्यांनी राजशिष्टाचाराची भाषा काय कळणार
माजी खासदार निलेश राणे यांनी जे वक्तव्य केले आहे त्यावरून जिल्ह्यातील जनतेला आपण यांना निवडून दिले नाही याचे समाधान वाटलं असेल. असे शिवसेना महिला जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत म्हणाल्या. शिवरायांचे मावळे महिलांचे रक्षण करणारे होते आणि हे मावळे बलात्कारी आहेत. असे सांगताना विकतच्या पदव्या घेतळलेल्यानं राजशिष्टाचाराची भाषा काय कळणार असेही त्या म्हणाल्या.