सिंधुदुर्ग - नारायण राणे आणि नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना गिफ्ट देण्याची कुवत आज तरी राहिलेली नाही. त्यांनी कितीही गिफ्ट देऊ केली तरी शिवसेनेला त्याची गरज नाही. शिवसेना पक्षप्रमुखांनी आपल्या मनाचा मोठेपणा किती आहे, तो दाखवून दिला आहे. तुम्ही शिवसेनेशी बेईमानी केली, तरीही तुमच्या मेडीकल काॅलेजचा प्रस्ताव शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच मंजूर केला, दुसऱ्या कोणी केला नाही. त्यामुळे नितेश राणेंकडून गिफ्ट स्वीकारण्याची वेळ शिवसेनेवर आजतरी आलेली नाही. मात्र नितेश राणे यांच्यावर ती वेळ लवकरच येणार आहे, असे प्रत्युत्तर खासदार विनायक राऊत यांनी दिले आहे.
भाजपच्या सात नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना नितेश राणे यांनी शिवसेना' हे आमचे जुने प्रेम आहे. 'व्हॅलेंटाईन डे'च्या निमित्ताने हे सात नगरसेवक मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवले आहेत. आमच्या मेडिकल कॉलेजच्या फाईलवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सही केली. याबाबत आम्ही त्यांना पुष्पगुच्छ जरी पाठवला तरी, ते आमच्याकडून घेणार नाहीत. मात्र, त्यांना एक भेट म्हणून हे नगरसेवक त्यांच्याकडे पाठवत आहे. त्यांनी त्यांचा स्वीकार करावा. अशा उपरोधित शब्दांत वाभावें-वैभववाडी नगरपंचायतीच्या नगरसेवकांनी भाजपच्या दिलेल्या राजीनाम्यावर आमदार नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली होती. त्यावर खासदार राऊत यांनी राणे यांची गिफ्ट देण्याची कूवत नसल्याची टीका केली. यावेळी खासदार राऊत यांनी निलेश राणे यांच्या धमकीवजा इशाऱ्याचाही समाचार घेतला.