सिंधुदुर्ग - नारायण राणेंनी गेली दहा वर्षे अनेक आव्हाने दिली आणि भविष्यवाणीही केल्या, काँग्रेसमध्ये असताना मी मुख्यमंत्री होणार, त्यानंतर शिवसेना विसर्जित करणार, अशा वेगवेगळ्या घोषणा त्यांनी केल्या होत्या. या त्यांच्या घोषणांचे पुढे काय झाले, हे लोकांना माहीत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार कोसळणार या राणेंच्या भविष्यवाणीला आता लोक काडीची किंमत देत नाहीत, अशा शब्दांत शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी राणेंचा समाचार घेतला आहे.
'नारायण राणेंच्या भविष्यवाणीला लोक काडीची किंमत देत नाहीत' - चिपी विमानतळ उद्घाटन
महाविकास आघाडी सरकार पुढील तीन महिन्यातच पडणार आणि केंद्रात आणि राज्यात भाजपाचेच सरकार येणार असल्याची भविष्यवाणी नारायण राणे यांनी केली होती. त्यावर शिवसेना आमदार वैभव नाईक राणेंच्या भविष्यवाणीला कोणी किंमत देत नसल्याची टीका केली आहे.
अनेक आमदार महाविकास आघाडीत पुन्हा येताहेत-
गेले एक वर्ष महाविकास आघाडीचे सरकार कोसळेल, असे भाकित राणे यांनी अनेकवेळा वर्तवले होते. मात्र एक वर्षाच्या कालावधीनंतर हे सरकार अजून भक्कम झाले आहे. तसेच भाजपमध्ये गेलेले अनेक आमदार हे शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीत पुन्हा येताहेत आणि पोटनिवडणूक लढवण्याची त्यांची मानसिक तयारीही झालीय, अशी माहितीही वैभव नाईक यांनी दिली. ते सिंधुदुर्ग मध्ये बोलत होते.
राजकीय भवितव्य टिकवण्यासाठीच ही राणेंची धडपड
रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमधीलसुद्धा अनेक कार्यकर्ते राणेंना सोडून पुन्हा सेनेत येतायत, ते आपल्यासोबत थांबले पाहिजेत. म्हणून राणेंची ही भविष्यवाणी सुरू आहे, स्वतःचं राजकीय भवितव्य टिकवण्यासाठीच ही राणेंची धडपड सुरू असल्याचा दावा वैभव नाईक यांनी बोलताना केलाय. तसेच शिवसेनेचे नेते संजय राऊत यांना ईडीने चौकशीची नोटीस दिली, मात्र ते शिवसेनेच्या बाण्यासारखे ईडीला सामोरे गेले. काय चौकशी करायची ती करा, पण आम्ही मान झुकवणार नाही, असं जाहीर आव्हान त्यांनी दिले आहे.
26 जानेवारीला चिपी विमानतळ सुरू होणार
तसेच चिपी विमानतळासंदर्भात राणेंनी विरोधाची भूमिका कायम ठेवता कामा नये, मी पणाची भूमिका सोडली तर येणाऱ्या 26 जानेवारीला चिपी विमानतळ सुरू होईल. आम्ही सर्वांना सोबत घेऊन हे विमानतळ चांगल्या प्रकारे सुरू राहील यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहितीही वैभव नाईक यांनी दिली.