सिंधुदुर्ग -राज्याचे दोन्ही विरोधी पक्षनेते कोकणात आले. मात्र, त्यांच्या दौऱ्यात नारायण राणेंना दुर ठेवण्यात आल्यामुळे त्या द्वेषातून राणे उद्धव ठाकरेंवर आरोप करत आहेत, या शब्दात शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी नारायण राणेंवर पलटवार केला. भाजपमध्ये आणि लोकांमध्ये राणेंची किंमत राहिली नाही म्हणून राणे वैफल्यग्रस्त झाल्याचे वैभव नाईक यांनी म्हटले आहे.
याबाबत बोलताना आमदार वैभव नाईक केंद्राकडून किती मदत मिळणार यावर राणेंनी बोलावे -
यावेळी बोलताना वैभव नाईक पुढे म्हणाले, राणे निसर्ग वादळातील नुकसानीला केंद्राकडून किती मदत मिळणार यावर न बोलता उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत आहेत. खरेतर उद्धव ठाकरे यांच्या कामाचे सर्वोच्च न्यायालयाने कौतुक केलेले आहे. केंद्राने उद्धव ठाकरे यांच्या कामाचा आदर्श घ्यावा, असेही न्यायालयाने म्हटले आहे. निसर्ग चक्रीवादळ झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तत्काळ कोकणला भेट दिली. ज्यादिवशी वादळ आले तेव्हा ते येथील परिस्थितीवर लक्ष ठेऊन होते. येथील परिस्थितीची ते माझ्याकडून आणि इतर लोकप्रतिनिधी यांच्याकडूनही ते माहिती घेत होते, असेही वैभव नाईक यांनी सांगितले.
हेही वाचा -संभाजीराजे उद्या घेणार शरद पवारांची भेट; मराठा आरक्षणावर होणार चर्चा
नारायण राणे नेमके काय म्हणाले होते -
नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांशी प्रदीर्घ चर्चा केली. यावेळी त्यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर टीका केली होती. राऊत नेहमी राज्यपाल आणि पंतप्रधानांवर टीका करतात. ही पदे घटनात्मक आहेत. त्यांचा सातत्याने अपमान केला जातो. आधी सरकारच्या झालेल्या कामांची प्रतिक्रिया घ्या. कुणाला हनुमान बनवायचे आणि कुणाला गणपती करायचे हे तुम्ही करता, अशी टीकाही त्यांनी केली. राज्यात जर कुठे भुताटकी असेल तर ती मंत्रालय, वर्षा आणि मातोश्रीवर आहे. तेथे शांती करा. मन शांती करा, शांती यज्ञही करा, असे सांगतानाच राऊतांची भाषा ही योग्य नाही. राज्यकर्त्यांना शोभणारी ही भाषा नाही, अशी टीका राणेंनी केली होती.
राज्यासाठी हे मुख्यमंत्री लायक नाही -
राज्यासाठी हे मुख्यमंत्री लायक नाहीत. त्यांच्या कोकण दौऱ्यातून काहीही निष्पन्न झाले नाही. दुष्काळ, अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्तीच्या काळात घरोघरी जावे लागते. पंचनामे करावे लागतात, असा टोलाही राणेंनी मुख्यमंत्र्यांना लगावला. तसेच मुख्यमंत्री ज्या विमानतळावर उतरले ते विमानतळ आधी सुरू करा. ज्या विमानतळाला परवानगी नाही, त्या ठिकाणी मुख्यमंत्री उतरतातच कसे?, असा सवाल ही राणेंनी केला.
हेही वाचा -शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात राज्याच्या परिस्थितीवर चर्चा