सिंधुदुर्ग - कोकणच्या किनारपट्टीवर निसर्ग वादळासारखी परिस्थिती पुन्हा निर्माण झाल्यास येथील लोकांना तातडीची मदत आणि सुरक्षा देता यावी, यासाठी सिंधुदुर्ग-रत्नागिरी व रायगड येथील समुद्रकिनाऱ्यावर १८ कोटी रुपये खर्च करून शेल्टर हाऊस उभारण्यात येणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी याबाबतची माहिती दिली. तर भाजप नेत्यांनी कोकणात दौरा करून आत्मनिर्भर अभियानाच्या नावाखाली जनतेच्या मनात खोटं बिंबवण्याचं काम केले असल्याचा आरोप पालकमंत्री उदय सामंत आणि रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांनी केला आहे. रविवारी या दोन्ही पालकमंत्र्यांनी झूम अॅपद्वारे संयुक्त पत्रकार परिषद घेतली, यावेळी ते बोलत होते.
'निसर्ग'ने सतर्क झाले..! कोकणातील समुद्र किनाऱ्यावर उभारणार शेल्टर हाऊस - निसर्ग चक्रीवादळ न्यूज
निसर्ग वादळासारखी परिस्थिती पुन्हा निर्माण झाल्यास येथील लोकांना तातडीची मदत आणि सुरक्षा देता यावी, यासाठी सिंधुदुर्ग-रत्नागिरी व रायगड येथील समुद्रकिनाऱ्यावर १८ कोटी रुपये खर्च करून शेल्टर हाऊस उभारण्यात येणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी याबाबतची माहिती दिली.
निसर्ग वादळ आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदा कोकणातील नुकसानग्रस्थ शेतकरी, बागायतदाराला जास्तीतजास्त नुकसानभरपाई मिळावी यासाठी NDRF च्या नियमात बदल केले. कोकणात तातडीने मदत पोहोचवली. आतापर्यंत पंच्याहत्तर टक्केहून अधिक नुकसान भरपाईची रक्कम वाटली गेली आहे. मात्र, विरोधक याबाबत बोलत नाहीत, ते केवळ जनतेच्या मनात विष कालवण्याचं काम करत आहेत, असा आरोप करत या दोन्ही जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी विरोधकावर निशाणा साधला.
निसर्ग वादळात नुकसान झालेल्यांना मिळणाऱ्या नुकसान भरपाई बाबत बोलताना ते म्हणाले, की कोकणातील सातबारामध्ये अनेकांची नावे आहेत. त्यामुळे मदतीचे वाटप करण्यात अडचण येत आहे. मात्र कोरोनाचा काळ लक्षात घेता, अन्य लोकांनी आपल्या येथील स्थायिक नातेवाईकाला हमीपत्र दिल्यास मदतीची ही रक्कम तत्काळ जमा करता येईल. हा पर्याय देखील आपण दोघांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याशी बोलून घेतला असल्यासाचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
आम्ही दोघेही शिवसेनेचे एकसंघ म्हणून असे काम करत आहोत. मात्र, आमच्यात एकमेकाबद्दल चीड निर्माण करायचे काम काहीजण करत आहेत. विरोधकांनी आम्हाला डिवचण्यासाठी कितीही तिळपापड केला, तरी आम्ही त्यांना पुरून उरू, प्रसंगी रस्त्यावर उतरू, आम्ही पाचवी-सहावीतले नाही, तर आमच्या दोन-तीन टर्म झाल्या आहेत, असा टोलाही उदय सामंत यांनी विरोधकांना लगावला आहे. तर येत्या दोन दिवसात कोकणातील नुकसानग्रस्त लाभार्थ्यांसाठीची उर्वरित रक्कम त्या-त्या जिल्हा प्रशासनांकडे वर्ग होईल अशी माहिती रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांनी यावेळी दिली.