सिंधुदुर्ग : काही दिवसांपूर्वी कणकवली तालुक्यातील असलदे गावात शैलेश तांबे नावाच्या व्यक्तीने स्वतःला जाळून घेत आत्महत्या केल्याची घटना घडली होती. मात्र आता कोकण रेल्वेचा कर्मचारी असलेल्या शैलेशने स्वतःच्या मृत्यूचा बनाव रचून भलत्याच व्यक्तीला जाळले असल्याचे समोर आले आहे. सोमवारी वैभववाडी पोलिसात हजर होत त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
काय घडली होती घटना?
कणकवली तालुक्यातील असलदे गावातील कोकण रेल्वेत कर्मचारी असलेला शैलेश तांबे गायब झाला. लगतच्या कोळोशी गावातच शेत मांगरात अज्ञात व्यक्तीचा जळालेल्या अवस्थेतील मृतदेह सापडला. त्या मृतदेहाशेजारी गायब झालेल्या कोकण रेल्वे कर्मचारी शैलेश तांबे याची ओळख दाखवणारी काही कागदपत्रे आणि कपडेही सापडले. त्यावरून माहेरी गेलेल्या शैलेशच्या पत्नीने घटनास्थळी जात हे प्रेत आपल्याच नवऱ्याचे असल्याची ओळख पटवली. मृतदेह सापडल्यानंतर कणकवली पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंदही झाली. मृतदेहाची ओळख पटल्यामुळे तो मृतदेह त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मृतदेहावर अंत्यसंस्कारही झाले. ही घटना 2 ऑगस्ट 2021 रोजी घडली. पण अचानक मृत म्हणून पोलीस ठाण्यात नोंद असलेला कोकण रेल्वे कर्मचारी शैलेश तांबे हा स्वतःला मारहाण झाली अशी तक्रार देण्यासाठी वैभववाडी पोलीस ठाण्यात 23 ऑगस्ट रोजी दाखल झाला. तेव्हा पोलिसच अवाक झाले.
सुरवातीला 4 व्यक्तींनी मारल्याचा बनाव
मला 4 अज्ञात व्यक्तींनी मारहाण केली, अशी तक्रार देण्यासाठी डोके फुटलेल्या, रक्तबंबाळ अवस्थेत शैलेश तांबे वैभववाडी पोलीस ठाण्यात गेला. पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांनी शैलेशला खाकी भाषेत विचारले. तेव्हा शैलेशला मारहाण झाली नसून त्याने स्वतःलाच दगड मारून घेतल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले. जखमी शैलेशला वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले. मात्र, त्याला वैभववाडी रुग्णालयातून पुढे कणकवली उपजिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले.