सिंधुदुर्ग- कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर वाढत चाललेली हिंसा व अत्याचार रोखण्याच्या अनुषंगाने सत्यशोधक विद्यार्थी संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी आणि कणकवलीत तहसीलदार आर. जे. पवार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष सुमित पेडणेकर, राहुल कदम, सिद्धार्थ पेडणेकर, रितेश तांबे, समीर तांबे, विवेक ताम्हणकर, स्वाती तेली आदी उपस्थित होते.
देशात लॉकडाऊन असताना दलित, आदिवासी, स्त्रिया, भटकेविमुक्त, कामगार, शेतकरी, विद्यार्थी यांच्यावरील अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. हिंसा व अत्याचार प्रकरणी शासन यंत्रणेची व पोलिसांची भूमिका अत्याचारी जातीयवादी लोकांचे मनोबले वाढवणारी असते. हे रोखले गेले पाहिजे. पोलीस तपास व पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये मुद्दामहून त्रुटी ठेवल्या जातात. त्यामुळे न्यायालयीन प्रक्रियेत गुन्हेगार मोकाट सुटतो, असे प्रकार रोखले गेले पाहिजेत. यासाठी कडक कायदा करण्यात यावा, अशी मागणी संघटनेकडून करण्यात आली आहे.