सिंधुदुर्ग - उत्तर प्रदेशातील हाथरस घटनेच्या निषेधार्थ आज (शुक्रवार) सत्यशोधक जन आंदोलन सिंधुदुर्गच्या वतीने कणकवलीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते प्रांताधिकारी कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला. डॉ. आंबेडकर पुतळ्याजवळ पीडितेला श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर तोंडाला मास्क व सोशल डिस्टन्स पाळत लोकशाही पद्धतीने हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी घोषणा आणि क्रांतीगीतांनी महामार्ग दणाणून गेला होता.
उत्तर प्रदेशातील भूलगडी या गावात १४ सप्टेंबर रोजीघडलेली दलित मुलीवरील अत्याचाराची घटना मानवतेला काळीमा फासणारी आहे. ही घटना एकूणच भारतातील जातीव्यवस्था -पितृसत्ता आणि भांडवलशाही यांचे द्योतक आहे. याचा घटनाक्रम लक्षात घेता हे सिद्ध होते की, उत्तर प्रदेशातील सरकार व प्रशासन आणि सवर्ण लोकांंची अभद्र यूती ही अमानवीय घटना दाबून टाकण्यासाठी आणि आरोपींना वाचविण्यासाठी प्रयत्नशील आहे. गुन्हा घडल्यानंतर गुन्हा दाखल न करता पीडित मुलीकडे दुर्लक्ष करणे, वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला न मानता पीडित मुलीला वेगळ्याच दवाखान्यात दाखल करणे, पीडितेच्या मृत्यूनंतर तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावणे, तिच्या कुटुंबाला डांबून ठेवणे व इतरांशी संपर्क न करू देणे हा गुन्हा दाबून टाकण्याचा संतापजनक प्रयत्न असून लोकशाही मूल्यावरच अत्याचार करण्यासारखे आहे, असे सिंधुदुर्गतीलसत्यशोधक जनआंदोलनाचे पदाधिकारी म्हणाले.