पणजी (गोवा) - पणजी शहराजवळच्या काकरा गावातील संतोष गाऊसो यांचा आवाज अखेर 2 वर्षानंतर सरकारपर्यंत पोहोचला आहे. गोव्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री फिलिप नेरी रॉड्रिग्स यांनी मानवतेच्या दृष्टीकोनातून संतोष गाऊसो यांना मदत केली जाईल असे म्हटले आहे. तसेच संबंधित अधिकाऱ्यांना या प्रकरणी तात्काळ माहिती सादर करण्याचे आदेशही त्यांनी दिल्याचे सांगितले. ईटीव्ही भारतने याबाबत विशेष बातमी प्रसिद्ध करत संतोष गाऊसो यांची व्यथा मांडली होती.
काय आहे संतोष गाऊसोंची व्यथा
पणजी शहराजवळच्या काकरा गावातील संतोष गाऊसो हे गेल्या दोन वर्षांपासून वादळात झालेल्या नुकसानाची भरपाई मिळावी म्हणून लढा देत आहेत. 25 जुलै, 2019 रोजी रात्री झालेल्या या वादळाचा पणजी शहराजवळच्या काकरा आणि अन्य एका गावाला जोरदार फटका बसला होता. या वादळात संतोष गाऊसो यांचे माड कोसळले, त्यात त्यांच्या मच्छिमारीसाठी वापरात असलेल्या होड्या तुटल्या होत्या. त्यामुळे मच्छिमारीवर स्वतःचे कुटुंब चालवणारे संतोष गाऊसो एका रात्रीत बेरोजगार झाले होते. त्यांची व्यथा ईटीव्ही भारतने विशेष वृत्तातून मांडली होती. त्याची दखल घेत गोव्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री फिलिप नेरी रॉड्रिग्स यांनी संतोष यांचे प्रकरण कोणत्या योजनेत बसत नसेल, तर मानवतेच्या दृष्टीकोनातून संतोष गाऊसो यांना मदत केली जाईल असे म्हटले आहे.
कोणत्या कारणात अडकली आहे संतोष यांची मदत?
वादळ झाल्यानंतर संतोष हे आपल्या नुकसानभरपाईसाठी मत्स्य विभागाकडे जातात. त्यांना आपल्या नुकसानीची माहिती देतात. नुकसानीचे फोटो सादर करतात. मात्र त्यांना या भागात वादळ झालंच नाही तर नुकसानभरपाई कसली ? असा उलट प्रश्न विचारला जातो. हवामान खात्याकडे वादळ झाल्याची नोंद आणि नुकसानीची पंचयादी त्यासोबत पोलिसातील एफआयआर मागितली जाते. संतोष पुढे हवामान खात्याकडेही जातात मात्र त्यांच्याकडेही वादळाची नोंद नाही. किंबहुना या वादळाचा इशाराही या खात्याने दिलेला नाही. मत्स्य विभाग देखील याच मुद्द्यावर अडून बसले होते. वादळाचे प्रत्यक्षदर्शी पुरावे संतोष यांच्याकडे आहेत. मात्र मत्स्य विभागाला शासकीय नोंदी हव्या आहेत. त्या मिळत नसल्याने संतोष गाऊसो यांचा प्रस्ताव मत्स्य विभागाने फेटाळला होता.