सिंधुदुर्ग - "गाव करी ते राव काय करी" अशी तळकोकणात म्हण आहे. मात्र कोकणी माणसानेच या म्हणीला फाटा दिला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातल्या माणगाव गावातीला धरण वाढीमधल्या तब्बल २० घरांचा गावातील २ माणसांनी रस्ता बंद केला आहे. याबाबत आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी थेट ग्रामपंचायतीसमोर उपोषणाचा इशारा दिला आहे. धरणवाडीत ३०० लोकवस्ती आहे. येथील मंदिरात एकत्र येत आता या लोकांनी थेट संघर्षाचा निश्चय केला आहे.
ग्रामपंचायतीच्या दप्तरी नोंद
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माणगाव हे जिल्ह्यातल्या सहकाराच्या क्रांतीतील एक महत्त्वाचे गाव म्हणून ओळखले जाते. जिल्ह्यातील कृषी प्रधान गाव म्हणूनही माणगावची ओळख आहे. मात्र याच गावात एकीतून उभ्या राहिलेल्या सहकाराच्या क्रांतीला फाटा देणारी घटना घडली आहे. गावातील धरण वाढीत जाणारा रस्ता येथीलच दोन ग्रामस्थांनी अडवला आहे. विशेष म्हणजे हा मार्ग ग्रामपंचायतीच्या दप्तरी नोंद आहे. त्यावर ग्रामपंचायतीने मार्ग बांधणीसाठी लाखो रुपयांचा निधी खर्च केला आहे. मात्र १२ फूट रुंदीचा हा मार्ग वाढीत पोचण्याच्या आतच येथील २ ग्रामस्थांनी दोन्ही बाजूला या मार्गावर अतिक्रमण केले आहे. एका बाजूने मार्ग खोदला आहे तर दुसऱ्या बाजूने घराच्या अंगणाला मार्गावरच पायऱ्या बांधल्या आहेत. अंगणाचे छप्पर थेट मार्गावरच आले असल्याने मोठे वाहनही पुढे जाऊ शकत नाही अशी स्थिती आहे. या ठिकाणी १२ फुटाच्या रुंदीच्या जागी केवळ ५ फुटांहून कमी मार्ग उरला आहे. दोन व्यक्तीची ही दहशत गावलाच नाही तर ग्रामपंचायत सत्ताधारी आणि प्रशासनालाही भारी पडत आहे.
राजकीय दबावामुळे कुठचीही कारवाई नाही
यावेळी बोलताना पांडुरंग वारंग म्हणाले, की या मार्गाच्या बाबतीत राजकीय दबाव असल्याने मार्गाची स्थिती वाईट आहे. हा मार्ग १९५८ साली ग्रामपंचायतीत नोंद झालेला रस्ता आहे. येथील २ नागरिकांनी एवढे अतिक्रमण केलेले आहे, कि त्या ठिकाणी रस्ता ५ फुटाचा झालेला आहे. त्यांनी सरकारी मालमत्तेवर अतिक्रमण केलेले आहे. त्यामुळे आमच्या वाडीपर्यंत साधे वाहनही येऊ शकत नाही. माझे वडील आता आजारी असतात. त्यांना कधीही डॉक्टराकडे जावे लागते. अशावेळी स्थानिकांची मदत नसती, तर माझे वडील आज नसते, हे सत्य आहे, असे ते यावेळी म्हणाले.