महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अनधिकृत वाळू पट्ट्यात महसूल विभागाची धडक कारवाई; वाळू माफियांचे धाबे दणाणले - सिंधुदुर्गात वाळू माफियांवर कारवाई

राजरोसपणे अनधिकृत वाळू उपसा होत असल्याने खाडी पट्ट्यातील रॅम्प जेसीबीच्या सहाय्याने महसूल विभागामार्फत उद्ध्वस्त करण्यात आले. हे रॅम्प उद्ध्वस्त केल्यामुळे वाळू माफियांचे मात्र धाबे दणाणले आहेत. जिल्ह्यात लॉकडाऊन काळात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर वाळू वाहतूक झाल्याचे समोर आले आहे.

सिंधुदुर्ग
सिंधुदुर्ग

By

Published : Nov 15, 2020, 12:35 PM IST

सिंधुदुर्ग -जिल्ह्यात अवैध वाळू उपसा मोठ्या प्रमाणात केला जात आहे. याविरोधात आता जिल्हा प्रशासनाने कंबर कसली आहे. प्रशासनाने जिल्ह्यात वाळू वाहतुकीसाठी वापरण्यात येणारे रॅम्प जेसीबीने तोडले आहेत. कुडाळ तालुक्यात ही कारवाई करण्यात आली.

कुडाळ तालुक्यातील सरंबळ, नेरूर, वालावल, चेंदवण, कवठी परिसरातील अनधिकृत वाळू उपसा होत असलेल्या खाडी पट्ट्यातील रॅम्प जेसीबीच्या सहाय्याने महसूल विभागामार्फत उद्ध्वस्त करण्यात आले. कुडाळ तहसीलदार अमोल फाटक यांच्या नेतृत्वाखालील ही कारवाई करण्यात आली. सध्या राजरोसपणे अनधिकृत वाळू उपसा होत असल्याने ग्रामस्थांमध्ये महसूल विभागाबाबत नाराजी होती. वाळू माफियांवर कारवाई करावी, या मागणीसाठी ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. तसेच माजी आमदार परशुराम उपरकर यांनी सुद्धा जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन केले होते.

वाळू माफियांचे धाबे दणाणले -

सिंधुदुर्ग दौऱ्यावर आलेले महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी अनधिकृत वाळू उपशावर कारवाईचे संकेत दिले होते. त्या अनुषंगाने आता महसूल विभाग कामाला लागला आहे. हे रॅम्प उद्ध्वस्त केल्यामुळे वाळू माफियांचे मात्र धाबे दणाणले आहेत.

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू व्यवसाय -

जिल्ह्याच्या विविध भागात मोठ्या प्रमाणात अवैध वाळू व्यवसाय चालतो. लॉकडाऊन काळात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर वाळू वाहतूक झाल्याचे समोर आले आहे. तसेच जिल्ह्यातील बांधकाम व्यवसायाला वाळू मिळत नाही. तर गोवा आणि कोल्हापूर या ठिकाणी देखील येथूनच वाळू जाते. याकडे प्रशासन सोईस्कर दुर्लक्ष करते, असा आरोप मनसेकडून केला गेला होता. याबाबत प्रशासकीय पातळीवर आता कारवाईचा बडगा उगारला जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details