सिंधुदुर्ग -गोवा शासनाने जाहीर केलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग-गोवा सीमेवर पत्रादेवी सीमा तपासणी नाक्यावर पोलिस बंदोबस्त कडक करण्यात आला आहे. अत्यावश्यक वाहने व दररोज ये-जा करणाऱ्या नोकरदारांना वगळता इतरांना आरटीपीसीआर निगेटिव्ह प्रमाणपत्र नसल्यास प्रवेशबंदी करण्यात आली आहे. येथे लॉकडाऊन निर्बंधांची कडेकोटपणे अंमलबजावणी सुरू आहे.
गोवा राज्यात २४ मे पर्यंत कडक लॉकडाऊनचा सिंधुदुर्ग वासियांना फटका -
गोवा शासनाने गोवा राज्यात २४ मे पर्यंत कडक लॉकडाउन जाहीर केला आहे. लॉकडाउन १०० टक्के यशस्वी करण्यासाठी गोवा पोलिसांनी महाराष्ट्र-गोवा सीमेवर बंदोबस्तात वाढ केली आहे. पत्रादेवी पोलिस तपासणी नाक्यावर महाराष्ट्र व इतर राज्यातून येणारी सर्व वाहने व प्रवाशांची चौकशी करण्यात येत आहे. ज्यांच्याकडे कोविड टेस्टचा निगेटिव्ह अहवाल नसल्यास त्यांना माघारी पाठवून देण्यात येत आहे. केवळ अत्यावश्यक सेवेसाठी जाणाऱ्या वाहनांना सोडण्यात येत आहे. त्याचबरोबर मालवाहू ट्रक व जीवनावश्यक साहित्य वाहतूक करणाऱ्या वाहनांना कोणतीही आडकाठी न करता गोव्यात प्रवेश देण्यात येत आहे. गोवा सीमा तपासणी नाक्यावर प्रत्येक वाहनांची कसून चौकशी करण्यात येत आहे. गोव्यात प्रवेश करणाऱ्या वाहनांची नोंदणी नाक्यावर करण्यात येत आहे. गोव्यात कडक लॉकडाउन करण्यात आल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणाऱ्या वाहनांची संख्या रोडावली आहे. महामार्गावर अत्यावश्यक सेवा देणारी वाहने वगळता इतर वाहनांची तुरळक वर्दळ आहे. बांदा-सटमटवाडी येथे सीमा तपासणी नाक्यावर तर शुकशुकाट दिसत आहे.