सिंधुदुर्ग- जिल्हाभरातील न्यायालयांतून आयोजित करण्यात आलेल्या यावर्षीच्या दुसऱ्या लोकदालतीत न्यायालयातील प्रलंबित आणि दाखलपूर्व अशी 10,407 प्रकरणे तडजोडी साठी ठेवण्यात आली होती. यातील 2435 प्रकरणे तडजोडी अंती निकाली निघालेली आहेत. तर एकूण 2 कोटी 31 लाख 56 हजार 27 रुपये तडजोड शुल्क वसूल झाल्याची माहीती जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव अतुल उबाळे यांनी दिली.
सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा व सत्र न्यायालयासह सर्व तालुका न्यायलयांतून शनिवारी लोक अदालत घेण्यात आली. या लोकअदालती चे उद्घाटन जिल्हा न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश एस.डी. जगमलानी यांच्या हस्ते करण्यात आले.
जिल्हा न्यायालयात एकूण चार पॅनेल खाली हे सर्व दावे निकाली काढण्यात आले. प्रमुख न्यायाधीश एस. डी. जगमलानी यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलमध्ये अँडव्हॉकेट व्ही. आर. पांगम, अशपाक शेख यांनी काम पाहीले. तर जिल्हा न्यायाधिश-१ व अतीरिक्त सत्र न्यायाधीश प्रकाश कदम यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलमध्ये अँडव्होकेट यतीश खानोलकर व एम.एस. भणगे यांनी काम पाहीले. जिल्हा न्यायाधिश-२ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. बी. रोटे यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलमध्ये अँडव्होकेट मुजावर व ए. एस. जगमलानी यांनी काम पाहिले. तर मुख्य न्यायदंडाधिकारी वर्षाराणी पत्रावळे यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलमधून अँडव्होकेट शुभांगी पाटील यांनी काम पाहीले.
न्याय मिळण्यास विलंब होत असल्यास लोकअदालत हा उत्तम पर्याय असल्याचे कोर्ट मॅनेजर प्रशांत मालकर यांनी यावेळी बोलताना सांगितले. तर सामंजस्याने प्रकरणे निकाली निघाल्याने सलोख्याचे संबंध प्रस्थापित होतात असे अतुल उबाळे यांनी स्पष्ट केले.यावेळी जिल्हा न्यायाधिश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश प्रकाश कदम, जिल्हा न्यायाधीश-२ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. बी. रोटे, मुख्य न्यायदंडाधिकारी वर्षाराणी पत्रावळे, न्यायाधीश अतुल उबाळे, कोर्ट मॅनेजर प्रशांत मालकर, विधिसेवा प्राधिकरण अधिक्षक टी. डी. पाटील आदी उपस्थित होते.