सिंधुदुर्ग - नारायण राणे आणि उद्धव ठाकरे यांचा संघर्ष उभ्या महाराष्ट्राला माहीत आहे. या संघर्षाला नेमकी सुरवात झाली ती नारायण राणे पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले तेव्हा. 1995 साली राज्यात युतीची सत्ता आली तेव्हा शिवसेनेत उघडउघड दोन गट होते. एकीकडे उद्धव ठाकरे, मनोहर जोशी आणि सुभाष देसाई होते. तर दुसऱ्या बाजूला राज ठाकरे, नारायण राणे आणि स्मिता ठाकरे होते. 1999 साली बाळासाहेबांनी जोशींना हटवून राणेंना मुख्यमंत्री केले आणि उद्धव विरुद्ध राणे वादाची पहिली ठिणगी पडली.
माहिती देताना राजकीय विश्लेषक हेही वाचा -शाखाप्रमुख ते मुख्यमंत्री, नारायण राणेंची केंद्रीय मंत्रीपदी वर्णी
...आणि उद्धव ठाकरे विरुद्ध राणे असा संघर्ष सुरू झाला
नारायण राणे यांच्या राजकीय वाटचालीत त्यांना कोणकोणत्या गोष्टींचा सामना करावा लागला याची माहिती देणारे त्यांचे आत्मचरित्रपर पुस्तक (No Holds Barred - My Years in Politics ) अत्यंत महत्वाचे आहे. या पुस्तकात नारायण राणे यांनी अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. 1999 साली बाळासाहेब ठाकरेंनी मनोहर जोशींना हटवून नारायण राणेंना मुख्यमंत्रिपदी नेमण्याचा निर्णय घेतला. नारायण राणेंना अवघे नऊ महिन्यांचे मुख्यमंत्रिपद मिळाले. महाराष्ट्र विधानसभा मुदतीपूर्वी विसर्जित करून निवडणुका घेण्याचा निर्णय भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेने घेतला. या निवडणुकीत सेना-भाजप युतीचा पराभव झाला. नारायण राणेंनी आपल्या याच आत्मचरित्रात या पराभवाचे खापर उद्धव ठाकरेंवर फोडले आहे.
उद्धव यांनी 'त्या' यादीतील नावे बदलल्याचा राणेंचा आरोप
महाराष्ट्राच्या राजकारणात टिकून राहण्यासाठी मराठा बहुजन चेहऱ्याची गरज आहे, हे बाळासाहेबांना जाणवले होते. म्हणूनच राणेंच्या गळ्यात तेव्हा मुख्यमंत्री पदाची माळ घालण्यात आली. मात्र, नऊ महिने मुख्यमंत्री म्हणून काम करत असताना मुदतपूर्व निवडणुकीत राणेंचे उमेदवार बदलण्यात आलेत, याबाबतही त्यांनी आत्मचरित्रात लिहिले आहे. दरम्यान महाराष्ट्र विधानसभा मुदतीपूर्वी विसर्जित करून निवडणुका घेण्याचा निर्णय भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेने घेतला. 1995 पासून सरकार चालवल्यानंतर दोन्ही पक्षांनी एकत्र निवडणूक लढवताना 171-117 असा फॉर्म्युला ठरवला. शिवसेनेने आपल्या कोट्यामधून 10 जागा इतर मित्र पक्षांना देण्याचे निश्चित केले. शिवसेनेच्या उमेदवारांची नावे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सहीने सामनामध्ये गेली. या यादीमध्ये उद्धव यांनी परस्पर 15 उमेदवारांची नावे बदलली, असा आरोप राणेंनी केला होता, अशी माहिती सिंधुदुर्गचे राजकीय विश्लेषक, पत्रकार महेश सावंत यांनी दिली.
पुन्हा मुख्यमंत्री होण्याची राणेंची संधी हुकली
महत्वाचे म्हणजे, ज्या 15 उमेदवारांची नावे उद्धव यांनी बदलली होती. त्यांपैकी 11 उमेदवार हे अपक्ष म्हणून किंवा दुसऱ्या पक्षांतून लढले आणि विजयीही झाले. या निवडणुकीत शिवसेनेचे 69 उमेदवार निवडून आले. हे अकरा बंडखोर आमदार पक्षात असते, तर सेनेच्या आमदारांची संख्या 80 झाली असती. भाजपचेही 56 आमदार निवडून आले होते. त्यामुळे, अपक्ष आणि अन्य लहान पक्षांच्या मदतीने सत्ता स्थापन करणे युतीला शक्य झाले असते. काही लहान पक्ष आणि अपक्षांच्या मदतीने युतीचा आकडा 136 वर गेला होता. मात्र, तरीही बहुमतासाठी 9 जागा कमी पडत होत्या. दरम्यान यावेळी प्रयत्न करूनही पक्षाकडून साथ मिळाली नसल्याने राणेंचे पुन्हा मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न भंगले. उद्धव ठाकरे यांनी नाव बदलली नसती तर अन्य पक्षात गेलेले शिवसेनेचे ते उमेदवार शिवसेनेतून निवडून आले असते. मात्र, उद्धव यांच्यामुळे शिवसेनेला फटका बसला, त्यात आपले मुख्यमंत्रिपद गेले याचे शल्य राणेंच्या मनात आजही आहे, असे महेश सावंत यांनी सांगितले.
विलासराव देशमुखांचे सरकार पडण्याचा केला होता प्रयत्न
नारायण राणे यांच्या आत्मचरित्रात अनेक उल्लेख आहेत, त्यापैकी विलासराव देशमुख सरकार पाडण्यासाठी केलेला त्यांचा प्रयत्न कसा वाया गेला, याच्यावरही भाष्य आहे. अनेक लहान पक्ष आणि अपक्ष आमदार यांच्या सहकार्याने विलासराव देशमुख यांचे सरकार बनले होते. राणे यावेळी विरोधी पक्षनेते होते. सरकारला अक्षरशः मेटाकुटीला आणण्याचे काम राणेंनी केले. सण 2002 मध्ये अपक्ष आणि लहान पक्षांनी विलासरावांच्या सरकारचा पाठिंबा काढला. नारायण राणे यांच्या महत्वकांक्षा पुन्हा जाग्या झाल्यात. त्यांनी सरकार कोसळण्याच्या सर्व हालचाली सुरू केल्या. मात्र, बाळासाहेब ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन 'सत्तेशिवाय आपली घुसमट होते, असे काही नाही. या सरकार पाडण्याच्या मोहिमेला आपला पाठिंबा नाही, असे स्पष्ट केले. राणेंची मुख्यमंत्री होण्याची दुसरी संधी हुकली. या सगळ्याच्या मागे उद्धव ठाकरे यांचा हात असल्याचा आरोप आपल्या पुस्तकातून राणे यांनी केला आहे.
पक्षात उद्धवराज सुरू झाले आणि राणे काँग्रेसमध्ये गेले
अखेर उद्धव ठाकरेंविरुद्ध नारायण राणे हा वाद पेटला तो उद्धव ठाकरे यांची पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर. राणेंचा उद्धव ठाकरे यांच्या निवडीला विरोध होता. त्यातच 2002 मध्ये कणकवलीत सत्यविजय भिसे यांची हत्या झाली. यावेळी विरोधी पक्षनेते असलेल्या राणेंच्या कणकवलीत घराची जाळपोळ झाली. युतीमधला कोणीही नेता आपल्या पाठीशी उभा राहिला नाही, याची खंत राणेंच्या मनात होतीच. त्यात उद्धव ठाकरे यांची निवड राणेंना आणखीनच खटकली. राणेंनी सेनेमध्ये पदांचा बाजार मांडला जात आहे, असा थेट आरोप केला. याच दरम्यान पक्षात आणि राणेंमध्ये दरी वाढत गेली. पक्षात उद्धवराज सुरू झाले होते. राणेंचीही पक्षातली घुसमट वाढली होती. त्यातून 2005 साली नारायण राणेंनी शिवसेनेला रामराम करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
खासदार नारायण राणे यांनी घेतली कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ
मोदी 2.0 सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात राज्यातून नारायण राणे यांना संधी मिळाली आहे. मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात समाविष्ट होणाऱ्या 43 मंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली. आज या सर्वांचा शपथविधी सोहळा राष्ट्रपती भवनामध्ये पार पडला. यावेळी नारायण राणे यांनी देखील शपथ घेतली.
हेही वाचा -नारायण राणे दिल्लीला रवाना, मंत्रिमंडळात वर्णी लागणार - राजन तेली