सिंधुदुर्ग -आनंद साजरा करावा पण त्याला काही मर्यादा आहेत, यात्रा लोकांच्या समृद्धीसाठी असली पाहिजे, असे मत शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केले आहे. नारायण राणे यांच्या जामिनावर हायकोर्टामध्ये १७ सप्टेंबर सुनावणी होणार आहे, यानंतर जर त्यांची टीका करण्याची भूमिका बदलली नाही, तर आम्ही राजकीय संघर्ष करायला तयार आहोत, असा थेट इशारा शिवसेना आमदार दीपक केसरकर यांनी राणेंना दिला आहे.
'राणेंच्या विरोधात माझा राजकीय संघर्ष अटळ' -
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आपली भूमिका बदलावी, अन्यथा जिल्ह्यातील शांतता अबाधित राखण्यासाठी त्यांच्याविरोधात माझा राजकीय संघर्ष अटळ आहे, असा इशारा आमदार दीपक केसरकर यांनी आज येथे दिला. दरम्यान याबाबतची भूमिका आपण १७ तारखेनंतर स्पष्ट करणार आहे. मात्र, कोरोना संकटात राणेंकडून जन आशीर्वाद यात्रा काढून गर्दी जमवणे हे येथील जनतेच्या आरोग्यासाठी धोकादायक आहे, असेही ते यावेळी म्हणाले. याबाबत त्यांनी आज आपल्या कार्यालयात पत्रकार परिषद घेतली.