सांगली - नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मंजूर करण्यात आलेली राज्य शासनाची प्रोत्साहन योजना फसवी असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केला आहे. तसेच, 18 जुलै पर्यंत योग्य निर्णय घेतला नाही, तर सरकार विरोधात आंदोलन करू, असा इशारा शेट्टी यांनी दिला आहे. तसेच, आगामी हंगामात एकरकमी एफआरपी जाहीर केल्या शिवाय उसाच्या कांड्याला देखील हात लावू देणार नाही, असा इशारा कारखानदारांना दिला आहे. ते सांगली मध्ये बोलत होते.
शेतकरी कर्जमुक्ती योजना फसवी, राजू शेट्टींचा आरोप; सरकार विरोधात मोर्चा काढण्याचा दिला इशारा - Farmers Debt Relief Scheme
नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मंजूर करण्यात आलेली राज्य शासनाची प्रोत्साहन योजना फसवी असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केला आहे. तसेच, 18 जुलै पर्यंत योग्य निर्णय घेतला नाही, तर सरकार विरोधात आंदोलन करू, असा इशारा शेट्टी यांनी दिला आहे

प्रामाणिक शेतकऱ्यांची फसवणूक -राज्य सरकारकडून महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत पूर्णत: कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यास नुकतेच मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. मात्र, राज्य सरकारची ही 'प्रोत्साहन' योजना शेतकऱ्यांची फसवणूक करणारी असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे. या योजनेमध्ये सांगली जिल्ह्यातला विचार केला तर 82 हजार 383 इतकी प्रामाणिक कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या आहे. सहकार विभागाच्या चुकीच्या निकषामुळे केवळ 16 हजार 111 शेतकऱ्यांना 50 हजार अनुदानाचा लाभ मिळणार आहे. आणि त्यामुळे 66 हजार 272 प्रामाणिक कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार नाही. त्यामुळे, राज्य शासनाची योजना फसवी असून येत्या 8 दिवसांत निकष बदलावेत अन्यथा 18 जुलै रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांचा धडक मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा राजू शेट्टी यांनी यावेळी दिला.
यंदा, एफआरपी शिवाय ऊसाची कांडी पण नाही -ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी देण्यामध्ये सांगली जिल्ह्यासह राज्यातल्या अनेक कारखान्यांनी फसवले आहे. त्यामुळे, पुढील हंगामात साखर कारखानदारांकडून एकरकमी एफआरपी जाहीर झाल्याशिवाय उसाच्या कांडीलाही हात लावू देणार नाही. गेल्यावेळी उसाचा अतिरिक्त असणारा साठा लक्षात घेऊन शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने संघर्षाची भूमिका घेतली नाही. मात्र, यावेळी एकरकमी एफआरपी जाहीर केल्याशिवाय साखर कारखाने सुरू होऊ देणार नाही. प्रसंगी रस्त्यावरची लढाई तीव्र केली जाईल, असा इशारा देखील साखर कारखानदारांना राजू शेट्टी यांनी दिला.