सिंधुदुर्ग- राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वतः वाहन चालवून सर्व नियमांचे पालन करत आहेत. मात्र, त्यांच्या शिवसेना पक्षाचे लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी 20 ते 50 लोक जमवून सरकारी योजनांची उद्घाटने करत फिरतात. हा प्रकार फारच गंभीर असून कोरोना महामारीत नियमांचे पालन न कारणाऱ्यांची चौकशी करा. राजकीय स्वार्थासाठी झुंबड करून लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्या शिवसेना पदाधिकाऱ्यांवर कारवाई करा, अशी मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे केली आहे.
राजन तेलींचे राज्यपालांना पत्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सत्ताधारी पक्षाचे लोकप्रतिनिधी पालकमंत्री, खासदार, आमदार आणि पक्षपदाधिकारी यांना कोविड 19 विषाणुचे आणि त्याचा फैलाव होण्याच्या गंभीर परिणामांची पर्वा नाही. त्यामुळेच बिनधास्तपणे झुंडी झुंडीने ही मंडळी वावरत आहेत. साथरोगाबाबत शासनाचे असलेले सर्व नियम धाब्यावर बसवत आहेत. पालकमंत्री, लोकप्रतिनिधी यांना काही आवश्यक अशा सरकारी आढावा बैठका, भेटी देणे गरजेचे आहे हे आपण समजू शकतो. पण, त्यांच्यासोबत रोजच्या बैठकांना शासकीय अधिकारी वगळता नेहमीचे 15-20 पदाधिकारी, कार्यकर्ते, त्यांच्या गाड्यांचा ताफा, ड्रायव्हर, पीए अशी भ्रमंती जिल्ह्यात सुरु आहे.
सरकारी मदत किंवा आमदार-खासदार यांच्या विकास निधीतून केलेली मदत जाहीर कार्यक्रम करुन राजरोस पक्ष प्रसिद्धी मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत. शासकीय योजनांच्या कामाच्या जाहीर उद्घयाटनाचे कार्यक्रम करीत आहेत. जिल्हा बँकेची अध्यक्ष निवडणूक डोळ्यासमोर ठेवून शेतकऱ्यांचे कैवारी असल्याचे भासवून तालुक्या-तालुक्यात लोक जमवून बैठका घेत फिरत आहेत.
आमदार महोदय आपले कार्यक्षेत्र नसलेल्या ठिकाणीसद्धा शासकीय अधिकाऱयांना वेठीस धरून आढावा बैठका घेत आहेत. तथाकथित नेतेमंडळी फोटोसेशनसाठी यांच्यासोबत जात आहेत. अशा सर्व ठिकाणाची उपस्थिती ही 25 ते 50 हून अधिकची आहे. खुद्द त्यांनीच प्रसिद्ध केलेली छायाचित्र याची साक्ष देत आहेत. त्यांच्या या कृतीतून जमावबंधी, लॉकडाऊन अशा सर्वच नियमांचा भंग होत आहे. मात्र, भाजप पक्ष नियम पाळून कोरोना संकट काळात काम करत आहे. कारण आम्हाला आज रोजी राजकारण नाही तर देशावरचे संकट महत्वाचे वाटत आहे.
भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे 50 हजार व्यक्तींना जेवण व्यवस्था किवा शिधा वाटप करण्यात आलेले आहे. अजूनही रोज 8 ठिकाणी कमळ थाळीच्या माध्यमातून रोज 100 ते 200 जणांची जेवण व्यवस्था, सर्वात आधी 1 हजार पीपीई कीट, आरोग्यकेंद्रांना 20 हजार मास्क, जिल्ह्यातील नागरिकांसाठी 60 हजार मास्क, समाजातील अनेक दुर्बल घटकांना आधार देण्याचे काम करण्यात आलेले आहे. हे सर्व कार्यकर्त्यांच्या स्वखर्चातून झालेले काम आहे.
जिल्ह्यातील सामान्य नागरिकांना एक न्याय आणि सत्ताधारी मंडळीना वेगळा न्याय मिळत असल्याने जनतेमध्ये याबाबत प्रचंड नाराजी निर्माण झालेली आहे. परंतु, ज्यांच्याकडे दाद मागावी ते प्रशासन नाईलाजाने का होईना सत्ताधारी मंडळीना पाठीशी घालत आहे. ही बाब सुद्धा गंभीर आहे. जनतेचे मनोधैर्य खचवण्यास ही गोष्ट पुरेशी कारणीभूत आहे. सुदैवाने सिंधुदुर्गात कोविड संक्रमण वाढलेले नाही. पण, धोका पुरेसा टळलेला नाही. अशा परिस्थितीत सत्ताधारी मंडळींच्या या गर्दीने साथीला हातभार दिला जावू शकतो याची भीती आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी राजन तेली यांनी केली आहे.