सिंधुदुर्ग - जिल्ह्यात वाढणारी कोरोना बाधितांची संख्या, त्यांच्याकडून आकरण्यात येणारी बिले, उपचार आणि सोयी सुविधांवरून विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरकरे यांनी आक्रमक भुमिका घेतली आहे. गरीबांची लुट करणाऱ्या खासगी रुग्णालयांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे. सोबतच सर्वसामान्यांना कर्ज काढून बिलं भरणं परवडणार नाही आणि जगण्यासाठी सामान्य माणूस कर्जबाजारी होतोय हे राज्य सरकारला शोभणार नसल्याचे मतही प्रविण दरेकरांनी व्यक्त केले आहे.
जिल्ह्यातील कोरोनास्थितीवर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना दरेकर म्हणाले, 'जिल्ह्यात सध्या कोरोनाचे रूग्ण वाढत असताना खासगी रुग्णालयांमध्ये रूग्णांना बेड उपलब्ध होत नाहीत, याशिवाय रूग्णांकडून अव्वाच्या-सव्वा बिले आकारली जातयेत. यावर मी स्वतः बोरीवलीमधे आंदोलन केलं होतं, गरीब व्यक्तीचं सात लाख रूपयाचं बिल त्याला परत केलं. सरकारनं या ठीकाणी भुमिका घेतली पाहीजे. केवळ पत्र पाठवून कार्यवाही होत नसते. तर सरकारनं अशा रुग्णालयांवर एफ. आय. आर. दाखल केली पाहीजे.