महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jan 23, 2021, 9:09 AM IST

ETV Bharat / state

बर्ड फ्ल्यूच्या धोक्याने सिंधुदुर्गात पोल्ट्री व्यावसायिक धास्तावले

कोरोनानंतर देशात आता बर्ड फ्ल्यूने थैमान घातले आहे. देशभरात लाखो कोंबड्या आणि पक्षी बर्ड फ्ल्यूमुळे मृत्यूमुखी पडले आहेत. याचा फटका पोल्ट्री व्यावसायिकांना सहन करावा लागत आहे.

bird flu
बर्ड फ्लू

सिंधुदुर्ग - राज्यभरात बर्ड फ्लूने थैमान घातले असून पोल्ट्री व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. सिंधुदुर्गात बर्ड फ्लूचा अद्याप धोका नसला तरी मागणी घटल्यामुळे येथील पोल्ट्री व्यवसायीक धास्तावले आहेत. त्यांना कर्जाचे हप्ते कसे भरावे, याची चिंता सतावत आहे.

सिंधुदुर्गात पोल्ट्री व्यावसायिक धास्तावले

आधीच कोरोनाने नुकसान आता बर्ड फ्लू -

गेले वर्षभर कोरोनाच्या काळात पोल्ट्री व्यवसाय डबघाईला आला. आता बर्ड फ्ल्यूमुळे पोल्ट्री व्यावसायिक पुरते हतबल झाले आहेत. बर्ड फ्लूमुळे कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे, अशी स्थिती येथील व्यावसायिकांची झाली आहे. जिल्ह्यात अद्याप कोरोनाची पुष्टी झालेली नाही. मात्र, अन्य भागात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता या ठिकाणी चिकन खाणाऱ्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे चिकनची मागणी घटली आहे.

मागणी घटल्याने पक्षांच्या खाद्याचा खर्च परवडेना -

आरती वारंग या माणगाव खोऱ्यातील पोल्ट्री व्यावसायिक आहेत. त्या सांगतात, कोरोनाच्या काळात कोंबड्याना मागणी नसल्यामुळे गेले एक वर्ष पोल्ट्री व्यवसाय धोक्यात आला होता. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर चिकन आणि अंड्याच्या मागणीत प्रचंड वाढ झाली होती. चिकन 200 रुपये तर एक डझन अंड्याचा भाव 80 रूपयांवर गेला होता. मात्र, आता बर्ड फ्लूमुळे मागणी घटल्यामुळे चिकनचा दर 100 ते 120 रूपये आणि अंड्यांचा दर 45 ते 50 रूपयांपर्यंत खाली आला आहे. आमच्याकडे हजारो पक्षी आहेत. त्यांना मागणी घटली आहे. त्यांच्या खाद्याचाही खर्च न परवडणारा आहे. कोरोनाच्या काळात आम्ही पक्षी अनेक लोकांना असेच देऊन टाकले होते. आता आम्ही पुरते अडचणीत आलो असून आम्हाला सरकारने मदतीचा हात द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

सिंधुदुर्गात दीड हजार व्यावसायिक -

जिल्ह्यात दिवसाला दोन लाख अंड्यांची मागणी होती. ती आता 80 हजारापर्यंत खाली आली आहे. तर चिकनची मागणी 40 ते 45 हजार किलोची होती. ती आता 15 ते 20 हजार किलोपर्यंत खाली आली आहे. त्यामुळे पोल्ट्री आणि अंडी व्यवसायिकांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात दीड हजार ते दोन हजार छोटे- मोठे पोल्ट्री व्यावसायिक आहेत. तर एकट्या कुडाळमधील माणगाव खोऱ्यात चारशे ते पाचशे व्यवसायिक पोल्ट्री आणि अंड्यांचा व्यवसाय करतात. मात्र, बर्ड फ्लूच्या धोक्यामुळे आता मागणी घटल्यामुळे हे व्यावसायिक अडचणीत आले आहेत. राज्य सरकारने मेलेल्या कोंबड्याना 90 आणि 70 रूपये नुकसान भरपाईची घोषणा केली असली, तरी सिंधुदुर्गात रोगामुळे कोंबडी मरण्याचे प्रमाण शुन्य आहे.

कवडीमोल दराने द्यावे लागतात पक्षी -

अनिल वारंग हे आपल्या पत्नीच्या व्यवसायात मदत करतात. ते सांगतात आज आमच्याकडे एक ते दीड हजार पक्षी आहेत. माझ्या पत्नीने बँकेचे 5 लाख रुपये कर्ज घेऊन हा व्यवसाय सुरू केला. आता बर्ड फ्ल्यूची चर्चा सुरू झाल्याने लोक घाबरली आहेत. त्यामुळे इथे कोण पक्षी घ्यायला येत नाहीत. त्यामुळे करायचे काय हा प्रश्न आहे. सध्या कवडीमोल दराने आम्हाला हे पक्षी विकावे लागतात. कोंबड्यांच्या खाद्याचा मोठा खर्च होत आहे. या पक्षांना 6 पोती खाद्य लागते. मात्र, फक्त त्यांचा जीव वाचावा म्हणून त्यांना दीड पोती खाद्य घालत आहोत, असेही ते म्हणाले.

सरकारकडे मदतीची मागणी -

दरम्यान जिल्ह्यातील प्रत्येक व्यावसायिकाच्या पोल्ट्रीत दीड हजार ते दोन हजार पक्षी आहेत. या पक्षाचे पुढे काय करायचे? असा प्रश्न त्यांच्या पुढे आहे. गेल्या एका वर्षात कोरोना आणि आता बर्ड फ्लूमुळे धोक्यात आलेल्या या व्यवसायाला सरकारने मदत करावी, अशी मागणी होऊ लागली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details