सिंधुदुर्ग - गेल्या पाच वर्षांपासून पडक्या घरात राहूनही साठ वर्षांची वृद्ध महिला सर्व सण उत्साहात साजरी करते. गुढी पाडव्यानिमित्त गुढीही उभारली आहे. जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील कासार्डे तर्फेवाडी येथील वैजयंती शांताराम मिराशी या साठ वर्षीय वृध्देची जीवनकथा अनेकांच्या डोळ्यात पाणी आणणारी आहे.
वैजयंती मिराशी या पावसाळयात तात्पुरता कागद लावून दिवस काढतात. काम केले तरच हाताचा आणि तोंडाचा मेळ लागतो. आयुष्याच्या अखेरच्या दिवसात तरी घर बांधायला शासकीय मदत मिळावी, अशी या महिलेची अपेक्षा आहे.
हेही वाचा-महाराष्ट्रात गुढीपाडव्याचा उत्सव; पाहा राजकीय नेत्यांच्या घरचा गुढीपाडवा
वैजयंती शांताराम मिराशी या वृध्देच्या घरात अठरा विश्व दारिद्र्य आहे. गेल्या अनेक वर्षांपासून घर पडले आहे. दररोज तोंडाचा आणि हाताचा सबंध येईल का? याबाबत प्रश्न असताना त्यांनी आज आपल्या घरासमोर आनंदाची गुढी उभारली आहे. तरीदेखील त्यांना मदतीची आवश्यकता आहे. हे सत्य नाकारून चालणार नाही. वैजयंती मिराशी या एकट्याच घरात राहतात. गेल्या अनेक वर्षांपासून घर बांधणीसाठी शासकीय मदत मिळावी यासाठी त्या प्रयत्नशील आहेत. मात्र, त्यांना कोणीही दाद देत नाहीत.
हेही वाचा-वयाच्या ८३ व्या वर्षी वहिदा रहमान यांनी केले अंदमान निकोबार बेटावर स्नॉर्केलिंग
घरात वीजही नाही
मातीचे आणि कौलारु असलेले घर पाच वर्षांपूर्वीच पडले. त्याच घरात कशीबशी राहत आहेत. गेले वर्षभर घरात वीज नसल्याने घरासमोरील वीज खांबावरील वीजेच्या प्रकाशात जेवण करतात. घराबाहेर अंगणात झोपतात. आजुबाजुला जंगल सदृश्य परिस्थिती असताना ही वृध्दा धाडसाने राहत आहे.
पावसाळ्यापूर्वी घर बांधणीसाठी मदत मिळावी-
घराच्या आजुबाजुला फारशी घरेही नाहीत. मग, या पडक्या घरात पावसाळ्यात राहतात कशा ? यावर त्यांनी सांगितले की , पावसाळ्यात कशीतरी कागद टाकून राहते. कसेतरी दिवस काढते. जवळजवळ गेली 10 वर्षे घर बांधणीसाठी मदत मिळावी म्हणून मी अक्षरश: वाट चालते. मात्र कोणीही दाद देत नाही. माझ्या आता अखेरच्या दिवसात तरी घर बांधायला शासन मदत देईल का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित करते. मागच्या पावसाळ्यात वीज मीटर जळल्याने मीटर काढून ठेवला आहे. नवीन मीटर घ्यायचा तर पैसे भरायची तेवढी आर्थिक ताकद नाही. त्यामुळे दरमहा येणारे वीजबील भरते. याही वयात काम करून मी दिवस काढत असल्याचे आर्ततेने त्या सांगतात. या पावसाळ्यापुर्वी घर बांधणीसाठी मदत मिळावी, अशी त्यांची इच्छा आहे.