सिंधुदुर्ग - लॉकडाऊनमुळे हाताला काम नाही, खिशात पैसा नाही, अशा स्थितीत जगायचे कसे, या विचाराने इतर राज्यात अडकलेले स्थलांतरीत मजूर मिळेल त्या वाहनाने घर गाठत आहेत. असेच कुडाळ-मालवणातील सुमारे 55 मजूर मालवाहक टेम्पोतून उत्तर प्रदेश येथे जाण्यासाठी निघाले असताना त्यांना हुंबरट येथे वाहतूक पोलिसांनी अडविले.
मालवाहू वाहनातून उत्तरप्रदेशला निघालेल्या मजुरांना पोलिसांनी घेतले ताब्यात - सिंधुदूर्ग स्थलांतरीत मजूर
लॉकडाऊन लागल्यापासून हे मजूर जिल्ह्यातच अडकून पडले होते. मात्र, त्यांना त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी व्यवस्था होत नसल्याने अखेर उत्तर प्रदेश येथील टेम्पोमार्फत ते गावी जाण्यासाठी निघाले होते.
लॉकडाऊन लागल्यापासून हे मजूर जिल्ह्यातच अडकून पडले होते. मात्र, त्यांना त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी व्यवस्था होत नसल्याने अखेर उत्तर प्रदेश येथील टेम्पोमार्फत ते गावी जाण्यासाठी निघाले होते. हुंबरट येथे महामार्गावर असलेल्या वाहतूक पोलिसांनी टेम्पो अडवून याबाबत कणकवली पोलीस ठाण्यात माहिती दिली. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक अवधूत बनकर यांनी त्या मजुरांना कुडाळ पोलिसांच्या स्वाधीन केले.
उत्तर प्रदेश येथील सिद्धार्थनगर जिल्ह्यातील हे 54 मजूर व एक टेम्पो चालक गेली 10-15 वर्षे सिंधुदुर्ग जिल्ह्यात व्यवसाय व मजुरीसाठी वास्तव्यास आहेत. गेला दिड महिना ते कामाविनाच असल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती. प्रशासकीय पातळीवर त्यांनी उत्तर प्रदेशला जाण्यासाठी परवानगी मागितल्याचे सांगितले. मात्र, परवानगी न मिळाल्याने आपल्या राज्यातील एका टेम्पो चालकाला सांगून ते उत्तर प्रदेश येथे जाण्यासाठी निघाले.
हे मजूर कुडाळ व मालवण येथ राहणारे होते. हे परप्रांतिय वेगवेगळ्या व्यवसायाच्या माध्यमातून आपला उदरनिर्वाह करत होते. दोन तालुक्यात भाड्याने राहत असताना आता भाडे देण्यासाठीही हातात पैसा नाही. त्यामुळे येथे थांबण्याऐवजी घरी परतण्याशिवाय या परप्रांतियांकडे पर्याय नसल्याचे त्यांनी सांगितले. कुडाळ-मालवणमधून हे परप्रांतिय हुंबरट येथे पोहोचल्यावर त्यांना तेथे वाहनांची तपासणी करण्यासाठी कार्यरत असलेले वाहतूक पोलीस प्रकाश गवस, बस्त्याव पिंटो, सुनील निकम, सावकार वावरे यांनी तो टेम्पो थांबवून चौकशी केली असता, टेम्पोत हे मजूर दाटीवाटीने बसलेले आढळून आले.
टेम्पो चालकाच्या नावे माल वाहतुकीचा ई पास -
याबाबत कणकवली पोलीस स्टेशनमध्ये माहिती देण्यात आली. या मजुरांना आपल्या घरी परतत असताना अडविल्याची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते बाळू मेस्त्रा, संजय कामतेकर, बाळा परब यांनी त्या परप्रांतियांची नाश्त्याची व्यवस्था केली. त्या टेम्पोचालकाच्या नावे माल वाहतुकीचा ई पास होता. मात्र, मालवाहक टेम्पोतून प्रवासी वाहतूक करता येणार नाही व उत्तर प्रदेश येथे जाण्यासाठी रितसर परवानगी घेऊन जाण्याची सूचना पोलिसांनी त्या मजुरांना केली.