सिंधुदुर्ग Narendra Modi :नौदल दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी सिंधुदुर्गात आले आहेत. येथील राजकोट किल्यावर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण केलं.
नौदलाच्या पदांना भारतीय परंपरेनुसार नावं देणार : यावेळी बोलताना पंतप्रधान मोदींनी एक मोठी घोषणा केली. भारतीय नौसेना आता अधिकारी पदांना भारतीय परंपरेनुसार नावं देणार असल्याचं मोदी यांनी जाहीर केलं. "४ डिसेंबर हा ऐतिहासिक दिवस आहे. या सिंधुदुर्गच्या भूमीतून देशाला नौदल दिवसाच्या शुभेच्छा देणं गौरवास्पद आहे", असं मोदी म्हणाले.
शिवाजी महाराजांनी नौदलाचा पाया रचला : "शिवाजी महाराजांना माहीत होतं की नौदल किती महत्वाचं आहे. त्यामुळे त्यांनी शक्तिशाली नौसेना बनवली. कान्होजी नाईक, हिरोजी इंदुलकर यांच्यासारखे योद्धे आमच्यासाठी प्रेरणा आहेत. शिवाजी महाराजांकडून प्रेरणा घेत भारत गुलामीची मानसिकता मागे टाकत आहे", असं मोदी म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजांनी भारतीय नौदलाचा पाया रचला, असं पंतप्रधान मोदींनी सांगितलं. नौदलाच्या नव्या ध्वजावर आणि लोगोवर छत्रपती शिवरायांच्या राजमुद्रेची छाप असल्याचं त्यांनी सांगितलं. ज्याचं समुद्रावर वर्चस्व तोच सर्वशक्तीमान हे शिवाजी महाराजांनी ओळखलं होतं, असे गौरवोद्वार पंतप्रधान मोदींनी काढले.
भारताचा इतिहास विजयाचा आहे : पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, भारताचा इतिहास केवळ गुलामीचा आणि गरिबीचा नाही. भारताचा इतिहास विजयाचा आहे. भारताचा इतिहास ज्ञान, विज्ञानाचा कलेचा आणि सागरी सामर्थ्याचा आहे. शेकडो वर्षापूर्वी शिवाजी महारांजानी कोणत्याही आधुनिक तंत्रज्ञानाशिवाय सिंधुदुर्गसारखे किल्ले बनवले. एकेकाळी सुरतच्या बंदरावर ८० पेक्षा जास्त देशांची जहाजं असायची. जेव्हा विदेशी शक्तींनी भारतावर हल्ला केला, तेव्हा त्यांनी सर्वात आधी आपल्या सागरी शक्तीला निशाणा बनवलं होतं, असं मोदी यांनी सांगितलं.
हेही वाचा :
- राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते अनावरण